पोलिस आयुक्तालयाचे आदेश ! कोरोनामुळे 'कोजागिरी'ची तुळजापूर पायी वारी यंदा नाहीच 

तात्या लांडगे
Wednesday, 7 October 2020

पोलिस आयुक्तालयाची नियमावली... 

 • देवीची आरती सकाळी सात ते दहा व सायंकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत करता येईल 
 • पहाटेच्या वेळी कोणत्याही भाविकांनी दर्शनासाठी रुपाभवानी मंदीर तथा अन्य देवीच्या मंदीराकडे चालत जाऊ नये 
 • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही मंदीरे खुली नाहीत, देवीच्या दर्शनाची ऑनलाईन सुविधा केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबूकद्वारे उपलब्ध असेल 
 • विजयादशमी दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलनही होणार नसून त्यास परवानगी नाही 
 • सीमोल्लंघनाचा कार्यक्रम होणार नसल्याने कोणीही गर्दी करू नये, रावण दहनासही असेल बंदी 
 • तेली समाजाच्या काठ्या व मानकऱ्यांशी होणार चर्चा; यंदा श्री रूपाभवानी देवी मंदीरातील उत्सव व अष्टमीसाठी 50 पेक्षा जास्त लोकांना परवानगी नाही

सोलापूर : राज्यातील कोरण्याची स्थिती पाहता यंदाचा नवरात्र महोत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त हजारो भाविक तुळजापूरला पायी जातात. मात्र, कोरोनामुळे यंदा त्यावर बंदी घालण्यात आली असून तसे आदेश पोलिस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनी आज काढले.

पोलिस आयुक्तालयाची नियमावली... 

 • देवीची आरती सकाळी सात ते दहा व सायंकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत करता येईल 
 • पहाटेच्या वेळी कोणत्याही भाविकांनी दर्शनासाठी रुपाभवानी मंदीर तथा अन्य देवीच्या मंदीराकडे चालत जाऊ नये 
 • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही मंदीरे खुली नाहीत, देवीच्या दर्शनाची ऑनलाईन सुविधा केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबूकद्वारे उपलब्ध असेल 
 • विजयादशमी दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलनही होणार नसून त्यास परवानगी नाही 
 • सीमोल्लंघनाचा कार्यक्रम होणार नसल्याने कोणीही गर्दी करू नये, रावण दहनासही असेल बंदी 
 • तेली समाजाच्या काठ्या व मानकऱ्यांशी होणार चर्चा; यंदा श्री रूपाभवानी देवी मंदीरातील उत्सव व अष्टमीसाठी 50 पेक्षा जास्त लोकांना परवानगी नाही

कोरोनामुळे नवरात्र उत्सवात देवीचे आगमन तथा विसर्जनाची कोणतीही मिरवणूक काढता येणार नाही. नवरात्र उत्सव मंडळांना सार्वजनिक ठिकाणी चौकात रस्त्यावर मंडप घालून श्री शक्तीदेवीची स्थापना करता येणार नाही. तर मंडळांनी ज्या ठिकाणी देवीची मंदीरे अथवा कायमस्वरूपी मूर्ती ठेवण्याची पक्की ठिकाणे आहेत, त्याठिकाणीच मूर्तीची प्रतिष्ठापना करावी, अशा सूचना पोलिस आयुक्तालयाने केल्या आहेत. कोणत्याही नवरात्र उत्सव मंडळांनी डॉल्बी, बॅंड पथक, नाशिक ढोल, ताशा, झांज पथक तथा लेझीम पथक वापरू नये. उत्सवाच्या अनुषंगाने बोर्डिंग, बॅनर, पोस्टर लावण्यासही बंदी असणार आहे. देवीच्या मूर्तीची उंची सार्वजनिक मंडळाकरीता चार फुटाची तर घरगुती देवीच्या मूर्तीची उंची दोन फुटांची असावी, असेही पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी शेजारील जिल्ह्यातून कोणत्याही व्यक्तीला नवरात्र महोत्सवासाठी परवानगी देऊ नये, असे आदेश काढले आहेत. या पार्श्वभूमीवर सोलापूर पोलिस आयुक्तांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज नवे आदेश पारित केले आहेत. तसेच शेजारील राज्यांनाही यासंदर्भात कळविण्यात आल्याची माहिती उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. 

  स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
  Web Title: Thousands of devotees go to Tuljapur on the occasion of Kojagiri full moon. However, it was banned this year due to corona