
सोलापूर : शहरातील सांडपाणी प्रक्रियेसाठी वापरल्यानंतर या पाण्यावर मोठ्या प्रमाणात चारा पिके घेतली जातात. या चाऱ्याच्या पिकांवर देखील शंभरहून अधिक प्रजातींचे पक्षी सुखाने जगत आहेत. सुमारे दहा लाखांवर गेलेल्या लोकसंख्येच्या सोलापूर शहरातून दररोज विसर्ग होणाऱ्या लाखो लिटर सांडपाण्यावर शहराच्या पश्चिम आणि उत्तर भागात बारमाही काही शेतकरी व गवळी बांधवांकडून हिरव्या गवताची शेती केली जाते. शहराच्या तुळजापूर, पुणे, मंगळवेढाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत लाखो लिटर सांडपाण्यावर कुरणशेती केली जाते. या कुरणशेतीच्या गवतावर विविध प्रकारचे पक्षी आपली भूक शमवण्यासाठी सकाळ ते संध्याकाळपर्यंत इकडून तिकडे उड्डाण घेत खाद्यान्न मटकावण्यात व्यस्त असताना दिसतात.
स्थानिक व स्थलांतरित पक्षी या हिरव्या गवतात अन्नाच्या शोधात वावरताना दिसतात. विविध घारी, ससाणे, पाणघार, शिक्रा इत्यादी शिकारी पक्षी गवतात आढळणाऱ्या नाना तऱ्हेचे कित्येक कीटक व त्यांच्या अळ्या, गोगलगाई, बेडकी, लहान साप - सरडे आदी भक्ष्यांवर ताव मारण्यात मग्न असतात. या ठिकाणी गायबगळे हे पक्षी मोठ्या संख्येने आढळतात. आकाशात गिर्रेबाजी करणारी काळी घार, उंचावरून टेहळणी करणारी ब्राह्मणी घार, मधमाशा धरणारा वेडा राघू, झाडावर तसेच विद्युत तारेवर बसून कधीतरी हवेत घिरट्या मारत राहणारे कोतवाल, पटकन सूर मारून खाद्य टिपणारा पांढऱ्या छातीचा खंड्या, टिटवी, गवतात लपून राहून सुरेल व कर्णमधुर आवाज करणारा तितर पक्षी मोठ्या प्रमाणात गवताळ प्रदेशात वावर करतानाचे दृश्य पक्षी निरीक्षकांना आकर्षित करतात. हे पक्षी गवतात काम करणाऱ्या स्थानिक लोकांशी अत्यंत सलगी साधून असतात; मात्र त्यांच्या इलाख्यात एखादा नवखा माणूस दिसला की माना उंचावून सावध होऊन किंचित दूर निघून जातात.
शहरवासीयांनी आपली गरज भागवून सोडलेल्या गटारीतून मार्ग काढत वाहणाऱ्या पाण्याच्या गवतावर जगणाऱ्या पक्ष्यांसाठी सोलापूरच्या आसपास असलेले गवताळ प्रदेश पिढ्यान्पिढ्या अन्नाचे कोठार ठरले आहेत. त्यामुळे अनेक विदेशी पक्षी दरवर्षी सोलापूरला वाऱ्या करत येथील स्थानिक पक्ष्यांबरोबर समरस होऊन हे पक्षी सोलापूरभोवती वाढणाऱ्या हिरव्या गवतात उपजीविका चालवतात, हे एक सोलापूरचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
आढळणारे पक्षी
वाढत्या लोकवस्ती व अतिक्रमणाने सोलापूरभोवती असलेले कुरणक्षेत्र धोक्यात येत आहे. या ठिकाणी सध्या अनेक हाउसिंग सोसायट्या व इतर काही वाणिज्य केंद्रे उभी राहात आहेत. त्यामुळे येथील पक्ष्यांवर संकट कोसळत आहे. गवतावर उदरनिर्वाहासाठी उत्तरेकडून हमखास येणारा नकटा बदक या स्थलांतरित पक्ष्यांनी आता येणे बंद केले आहे.
- डॉ. अरविंद कुंभार,
ज्येष्ठ पक्षी अभ्यासक
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.