वेळापुरात पावसामुळे घरे-दुकानात पाणी, संसार उघड्यावर, शेतीचेही मोठे नुकसान

अशोक पवार
Thursday, 15 October 2020

वेळापूर, उघडेवाडी, पिसेवाडी, धानोरे, खंडाळी, मळोली आदी परिसरात मका, बाजरी या पिकांसह तोडणीस आलेला ऊस, डाळिंब, पपई, केळी, द्राक्ष या फळबागांचीही मोठी हानी झाली. 

वेळापूर (सोलापूर) : सलग तीन दिवसांच्या दमदार पावसाने वेळापूर परिसरात हाहाकार उडाला आहे. मंगळवारी पहाटे सुरू झालेला मुसळधार पाऊस पंधरा तासानंतर थांबला. तोपर्यंत सखल भागातील अनेक कुटुंबांचे संसार पाण्याखाली गेले. अनेक कुटुंबे उघड्यावर आली. परिसरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. वेळापूर, उघडेवाडी, पिसेवाडी, धानोरे, खंडाळी, मळोली आदी परिसरात मका, बाजरी या पिकांसह तोडणीस आलेला ऊस, डाळिंब, पपई, केळी, द्राक्ष या फळबागांचीही मोठी हानी झाली. 
 
वेळापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पूर्वेकडील बाजूला राहणाऱ्या ओंकार पवार, राजेंद्र मैड, नारायण वाघमारे, गायत्री वाडकर, सुभाष मोरे आदींच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरून संसार उपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाले. माजी जिल्हा परिषद सदस्य सतीशराव माने देशमुख यांनी तत्परतेने घटनास्थळी जाऊन नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले. सहकार महर्षी विद्यालयाच्या प्रवेशद्वारा समोरील भुसार माल आणि किराणा व्यापारी गजानन भीमाशंकर शेटे यांच्या गोडाऊन आणि दुकानांमध्ये पावसाचे प्रचंड पाणी अचानक घुसल्याने २० टन मका, एक टन गहू, बाजरी, ज्वारी या धान्याच्या ढिगाऱ्याखाली पाणी भरले होते.

सलग दुसऱ्या वर्षी गावातून जाणारा ओढा ओव्हरफ्लो होऊन दोन्ही बाजूच्या घरे आणि दुकानातून पाणी वाहत होते. यामध्ये ज्योतिर्लिंग मंदिर, खंडोबा मंदिरात पाणी शिरून तेथील पुजारी प्रदीप काका गुरव आणि दत्तात्रेय वाघे यांच्या या घरांचे मोठे नुकसान झाले. येथील नवीन बाजार तळावरील मंडई आणि मटन मार्केट ही पाण्याखाली होते. ओढ्याच्या पाण्यामुळे अशोक वाघमारे, बाळासाहेब वाघमारे, नवनाथ कुंभार यांच्याही घरांचे नुकसान झाले.

नवनाथ कुंभार यांचे घराच्या भिंती कोसळल्या परंतु सावध असल्याने जीवितहानी थोडक्‍यात टळली. माजी जिल्हा परिषद सदस्य सतीशराव माने देशमुख यांनी प्रशासनाकडे त्वरित पंचनामा करून हवालदिल शेतकरी व उघड्यावरील कुटुंबांना दिलासा देण्याची मागणी केली आहे. आमदार राम सातपुते यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना दिल्याचे सांगितले.

माळशिरसचे तहसीलदार जगदीश निंबाळकर म्हणाले, अभूतपूर्व पावसामुळे माळशिरस तालुक्यातील सर्वच गावांमध्ये संकटाची स्थिती ओढावली आहे. स्थानिक स्तरावरील तलाठी, मंडल अधिकारी यांना नुकसानग्रस्त पिके व घरांच्या पंचनाम्याच्या सूचना केल्या आहेत. नागरिकांनी नुकसानीचे फोटो काढून ठेवावेत.
 

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three consecutive days of rains have caused severe damage in the Velapur area