काळविटाच्या शिकाऱ्याबरोबर मांस विकत घेतलेल्या दोघांनाही मिळाली वनकोठडी 

अरविंद मोटे 
Tuesday, 1 September 2020

काळविटाची शिकार केलेल्या आरोपी विजयकुमार भोसले याच्यासह विष्णू व्यंकट बनसोडे व मुतण्णा शिवाप्पा कोळी यांनी आरोपीकडून काळविटाचे मांस विकत घेतल्यामुळे त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेव्हापासून तिघेही संशयित वनकोठडीत होते. त्या तिघांना आज (मंगळवारी) पुन्हा एका दिवसाची वाढीव वनकोठडी मिळाली आहे. 

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील संगदरी येथे झालेल्या काळवीट शिकार प्रकरणात शिकार करणाऱ्या आरोपीबरोबरच काळविटाचे मांस विकत घेणाऱ्या दोघांना अटक झाली असून, आज त्यांना एक दिवसाची वाढीव वनकोठडी मिळाली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी, की दक्षिण सोलापूर येथे काहीजण वन्यजीवाचे शिकार केल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुषंगाने वनपाल दक्षिण सोलापूर, पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी व वनरक्षक गंगाधर कणबस यांनी 28 ऑगस्ट रोजी समक्ष घटनास्थळावर जाऊन पाहणी केली असता आरोपी विजयकुमार सुदाम भोसले याने काळविटाची शिकार केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आरोपीस ताब्यात घेऊन संपूर्ण घराची तपासणी केली असता त्यामध्ये वन्यजीवांची शिकार करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य त्यामध्ये मांसाचे तुकडे करण्यासाठी वापरण्यात आलेला लाकडी ठोकळा, टोपले, कच्चे मांस ठेवलेले पातेले, मांस विकण्याचा तराजू, 500 ग्रॅम वजनाचे माप, काळविटाची शिंगे, कुऱ्हाड, सुरी, कानस, लांबदांडी लोखंडी कोयता, विळा, खुरपे, मांस अडकविलेली दोरी, आडकित्ता, शिकार पकडण्यासाठी जाळीला बांधण्याचे धुंगरू, कच्चे मांस अंदाजे एक किलो, काळविटाच्या पायाचे खूर कापलेले चार नग (ताजे), काळवीट चामडीचे तुकडे, शिजवलेला काळजाचा तुकडा, नायलॉन वायरचे फासे, लोखंडी तारेचे फासे, शिकार करण्याचे वाघूर आदी साहित्य आढळून आले. 

विजयकुमार भोसले (रा. संगदरी, ता. दक्षिण सोलापूर) याला पुढील चौकशीकरिता ताब्यात घेतले. वनपाल दक्षिण सोलापूर व वनरक्षक गंगाधर कणबस यांनी अधिक चौकशी केली असता वन्यप्राणी काळविटाची शिकार झाल्याचे निर्दशनास आले म्हणून त्याच्याविरुद्ध भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला न्यायालयाने एक दिवसाची वनकोठडी ठोठवली. त्याचबरोबर आरोपी विष्णू व्यंकट बनसोडे व मुतण्णा शिवाप्पा कोळी यांनी आरोपीकडून काळविटाचे मांस विकत घेतल्यामुळे त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून तिघेही संशयित वनकोठडीत होते. त्या तिघांना आज (मंगळवारी) पुन्हा एका दिवसाची वाढीव वनकोठडी मिळाली आहे. केवळ शिकार करणे हा गुन्हा आहेच पण मांस विकत घेणे, खाणे हे देखील तुम्हाला तुरुंगाची हवा खायला लावू शकते, हे सिद्ध झाले आहे. या प्रकरणात अजून काही जणांना अटक होऊ शकते. आरोपी विजयकुमार भोसले याच्या मोबाईल कॉल रेकॉर्डवरून पुढील तपास वनखात्याकडून सुरू आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी इरशाद अहमद म. हसनसाब शेख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three jailed for one day in antelope hunting case