
महावितरणची आर्थिक स्थिती वीज बिलांच्या वाढत्या थकबाकीमुळे गंभीर झाली आहे. या अत्यंत कठीण अवस्थेत महावितरणचा आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी प्रचंड मोठी कसरत करावी लागत आहे. एप्रिल 2020 पासून सोलापूर जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील तब्बल 2 लाख 89 हजार वीज ग्राहकांनी एकाही महिन्याचे वीजबिल भरले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सोलापूर : महावितरणची आर्थिक स्थिती वीज बिलांच्या वाढत्या थकबाकीमुळे गंभीर झाली आहे. या अत्यंत कठीण अवस्थेत महावितरणचा आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी प्रचंड मोठी कसरत करावी लागत आहे. एप्रिल 2020 पासून सोलापूर जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील तब्बल 2 लाख 89 हजार वीज ग्राहकांनी एकाही महिन्याचे वीजबिल भरले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सध्या वीजपुरवठा सुरू असलेल्या या सर्व ग्राहकांकडे तब्बल 181 कोटी 45 लाख रुपयांची थकबाकी आहे. जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील 4 लाख 43 हजार 750 ग्राहकांकडे सद्य:स्थितीत तब्बल 260 कोटी 25 लाख रुपयांची थकबाकी आहे. मार्चपासून कोरोनाचे संकट सुरू झाले. तेव्हापासूनच महावितरणच्या आर्थिक संकटाला देखील सुरवात झाली. लॉकडाउनमध्ये रीडिंग घेता आले नाही. अनलॉकनंतर देण्यात आलेल्या सरासरी वीज बिलांची योग्य दुरुस्ती केल्याचा दावा महावितरणने केला आहे. मीटर रीडिंगप्रमाणे वीजबिल देण्याची प्रक्रियादेखील पूर्ववत झाल्याचा दावा महावितरण करत आहे.
अनलॉकनंतर मीटर रीडिंगप्रमाणे देण्यात आलेली वीजबिले अचूक असल्याचा निर्वाळा वीज तज्ज्ञांनी देखील दिलेला आहे. मात्र गेल्या एप्रिल महिन्यापासून जिल्ह्यातील 2 लाख 89 हजार 283 घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीज ग्राहकांनी नोव्हेंबरपर्यंतच्या एकाही वीजबिलाचा भरणा केला नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे थकबाकीमध्ये तब्बल 181 कोटी 45 लाख रुपयांची भर पडली आहे.
आकडे बोलतात...
2 लाख 74 हजार झाले थकबाकीदार
लॉकडाउननंतर महावितरणच्या थकबाकीदारांमध्ये नव्या 2 लाख 74 हजार ग्राहकांची भर पडली आहे. परिणामी 176 कोटी 80 लाखांनी थकबाकी देखील वाढली आहे. जिल्ह्यातील 3 हजार 793 थकबाकीदारांनी नोव्हेंबरमध्ये थकीत वीजबिलांचा भरणा केला आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक 4 लाख 43 हजार 750 ग्राहकांकडे 260 कोटी 25 लाख रुपयांची थकबाकी आहे.
संपादन : श्रीनिवास दुध्याल