
लग्नासाठी तयार असलेल्या मुलींचे फोटो आणि मोबाईल नंबर दिले. मोबाईलवरून श्याम शिंदे यांनी त्या मुलीशी बोलणे सुरू केले. दरम्यान, नवरी मुलींकडून लग्नासाठी लागणारे कपडे, सोने, कपाट आदी साहित्य खरेदी करण्यासाठी पैशाची मागणी केली. त्यानुसार श्याम शिंदे यांनी त्यांचे व त्यांच्यासह इतरांनी विवाहासाठी नोंदणी केलेल्या चार मित्रांचे मिळून दोन लाख रुपये राज पाटील यांच्या नावे ऑनलाइन पाठविले.
पंढरपूर (सोलापूर) : मॅरेज ब्यूरोच्या माध्यमातून आंतरजातीय विवाह लावून देण्याचे आमिष दाखवून 15 विवाह इच्छुकांची सुमारे सहा लाख 60 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईतील तिघांविरोधात पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शहाजी शिवाजी शिंदे (रा. सुस्ते, ता. पंढरपूर) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
याबाबतची पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की मुंबई येथील "नवरी मिळे नवऱ्याला' या विवाह संस्थेच्या माध्यमातून विवाह जुळवून देण्याचे फिर्यादीला आमिष दाखवले होते. त्यानुसार संशयित आरोपी राज पाटील, सचिन परमानंद बनसोडे, सागर अनिल जाधव (सर्व रा, अंधेरी, मुंबई) यांच्यावर विश्वास ठेवून फिर्यादीने श्याम शिंदे, दीपक पाटील, विठ्ठल वायकर, सागर टोमटे, संतोष पवार, महादेव कांबळे, योगेश कुलकर्णी, दादा महाजन, आनंद पांडव, संभाजी सपाटे, शाहरुख शेख, ज्ञानेश्वर लोहकरे यांच्याकडून आंतरजातीय विवाह लावून देतो म्हणून 6 लाख 60 हजार रुपये जमा करून आरोपींच्या बॅंक खात्यावर भरले होते. त्यानंतर विवाह लावण्यासाठी फिर्यादीने संययित आरोपींच्या मोबाईलवर वारंवार संपर्क साधूनही त्यांच्याशी संपर्क झाला नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी शहाजी शिंदे यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी राज पाटील, सचिन परमानंद बनसोडे व सागर अनिल जाधव यांच्या विरोधात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस निरीक्षक किरण अवचर हे करीत आहेत.
काय आहे प्रकरण?
मुंबई येथील "नवरी मिळे नवऱ्याला' या विवाह जुळवून देणाऱ्या विवाह संस्थेतील राज पाटील आणि सचिन बनसोडे यांची सुस्ते (ता. पंढरपूर) येथील शहाजी शिंदे यांची समाज माध्यमातून ओळख झाली. ओळखीतून राज पाटील यांनी शिवाजी शिंदे यांना पैशाचे आणि नोकरी लावण्याचे आमिष दाखवून विवाह इच्छुक तरुणांकडून पैसे घेऊन नोंदणी करण्यास सांगितले. त्यानुसार शहाजी शिंदे यांनी गावातीलच विवाह इच्छुक असलेल्या श्याम शिंदे यांना माहिती देऊन त्यांचीही या विवाह संस्थेत विवाहासाठी नाव नोंदणी केली.
त्यानंतर लग्नासाठी तयार असलेल्या मुलींचे फोटो आणि मोबाईल नंबर दिले. मोबाईलवरून श्याम शिंदे यांनी त्या मुलीशी बोलणे सुरू केले. दरम्यान, नवरी मुलींकडून लग्नासाठी लागणारे कपडे, सोने, कपाट आदी साहित्य खरेदी करण्यासाठी पैशाची मागणी केली. त्यानुसार श्याम शिंदे यांनी त्यांचे व त्यांच्यासह इतरांनी विवाहासाठी नोंदणी केलेल्या चार मित्रांचे मिळून दोन लाख रुपये राज पाटील यांच्या नावे ऑनलाइन पाठविले. पैसे मिळाल्यानंतर विवाह नोंदणी संस्थेकडून 1 डिसेंबर ही विवाहाची तारीख देण्यात आली होती. विवाहाची तारीख उलटून गेल्यानंतर श्री. शिंदे व त्यांच्या इतर मित्रांनी फोनवरून संबंधित विवाह संस्थेशी व राज पाटील या व्यक्तीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचे फोन बंद असल्याने त्यांच्याशी संपर्क झाला नाही. त्यानंतरही संबंधित संस्थेकडे वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही अद्याप संपर्क झाला नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शहाजी शिंदे व श्याम शिंदे यांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन 29 डिसेंबर रोजी तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
संपादन : श्रीनिवास दुध्याल