
जेईई (मेन) सेकंड ही परीक्षा सप्टेंबर 2020 मध्ये घेण्यात आली होती. या परीक्षेमध्ये वालचंद कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्सचे 37 विद्यार्थी जेईई (ऍडव्हान्स्ड) परीक्षेसाठी पात्र ठरले होते. यापैकी तीन विद्यार्थी जेईई (ऍडव्हान्स्ड) मध्ये यशस्वी झाले आहेत. हे विद्यार्थी भारतातील विविध आयआयटी संस्थेत प्रवेश मिळवण्यास पात्र ठरले आहेत.
सोलापूर : जेईई (मेन) सेकंड ही परीक्षा सप्टेंबर 2020 मध्ये घेण्यात आली होती. या परीक्षेमध्ये वालचंद कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्सचे 37 विद्यार्थी जेईई (ऍडव्हान्स्ड) परीक्षेसाठी पात्र ठरले होते. यापैकी तीन विद्यार्थी जेईई (ऍडव्हान्स्ड) मध्ये यशस्वी झाले आहेत. हे विद्यार्थी भारतातील विविध आयआयटी संस्थेत प्रवेश मिळवण्यास पात्र ठरले आहेत.
जेईई ऍडव्हान्स्डमध्ये यशस्वी ठरलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे : प्रशांत कमले, शिवानी इंगळे, अभिषेक टाक.
यशस्वी विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया
प्रशांत कमले : वडिलांच्या इच्छेनेच यशस्वी इंजिनिअर होणार
सीमा सुरक्षा दलामध्ये सेवा देऊन वडील निवृत्त झाले. वडिलांची सेवा कश्मीर, गुजरात आणि पंजाब अशा विविध ठिकाणी झाले असल्यामुळे माझे शिक्षणही अशा विविध ठिकाणी झाले. सांस्कृतिक आदान- प्रदानातून शिक्षणाचे महत्त्व समजले. त्याचबरोबर वालचंद महाविद्यालयातील शिक्षकांनी अभ्यासात गोडी निर्माण करून देण्यासाठी घेतलेले परिश्रम मला महत्त्वाचे वाटते. इंजिनिअरिंग स्टडीसाठी आय. आय. टी. प्रवेश मिळते, हे माझ्यासाठी आणि माझ्या परिवारासाठी टर्निंग पॉईंट आहे.
शिवानी इंगळे : सॉफ्टवेअर इंजिनिअर होणार
गणित विषय आवडीचा आहे. त्यामुळे इंजिनिअरिंग करण्याची मनस्वी इच्छा आहे. आता आय. आय. टी. मध्ये प्रवेश मिळणार, याचं मला खूप आनंद होत आहे. वडील मोठ्या कष्टातून शिकवत आहेत. आई यंदाच्या वर्षी बीएची परीक्षा देत आहे. घरात अभ्यासाचे वातावरण आहे. मुंबई आय. आय. टी. मधून सॉफ्टवेअर इंजिनिअर होऊन देशाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याची इच्छा आहे.
अभिषेक टाक : राष्ट्रसेवेसाठीच इंजिनिअर बनणार
वडील खासगी कंपनीत अत्यल्प वेतनावर काम करीत असून, ते आजारी असतात. आर्थिक दृष्टचक्रातून बाहेर पडण्याबरोबर राष्ट्रसेवा घडली पाहिजे, या दृढनिश्चयाने मुंबई, कानपूर, भुवनेश्वर यापैकी मिळेल त्या आय. आय. टी. मधून सॉफ्टवेअर इंजिनिअर होण्यासाठी मेहनत घेणार आहे. वालचंद महाविद्यालयातील शिक्षकांमुळे माझे स्वप्न पूर्णत्वास येत आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष कोटी, उपप्राचार्य संजय शहा आणि समन्वयक सारिका महिंद्रकर यांनी सत्कार केला. संस्थेच्या समस्त विश्वस्तांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.