अक्कलकोट शहरात तीन, कुंभारीत दोन, सांगोल्यात एक कोरोना बाधित

प्रमोद बोडके
गुरुवार, 28 मे 2020

ग्रामीण भागाला मुंबई-पुण्याचा धोका 
मुंबई परिसरात व पुणे परिसरात  नोकरी, शिक्षणानिमित्त गेलेले अनेक लोक  आता आपल्या मूळ गावी सोलापूर जिल्ह्यात येऊ लागले आहेत. त्यामुळे सांगोला, माळशिरस, करमाळा, पंढरपूर  या तालुक्यांसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला   मुंबई-पुण्यातील कोरोनाबाधितांचा मोठा धोका मानला जात आहे . आज सांगोला तालुक्यात कोरोना बाधित आढळलेला व्यक्ती हा मुंबई परिसरातून आला आहे. पंढरपूर तालुक्यातील उपरी गावामध्ये  आढळलेला पहिला कोरोना बाधित रुग्ण हादेखील मुंबई परिसरातून आला असल्याने  जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला  सोलापूर शहरासह मुंबई-पुण्यातील  कोरोनाचा धोका सतावू लागला आहे.

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. आज सकाळी  नव्याने आढळलेल्या  42 कोरोना बाधित रुग्णांमध्ये  अक्कलकोट शहरातील तीन, सांगोला तालुक्यातील निजामपूर येथील एक आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी विडी घरकुल मधील  दोन रुग्णांचा समावेश आहे.

दक्षिण सोलापूरच्या प्रांताधिकारी  ज्योती पाटील  म्हणाल्या,  अक्कलकोट शहरामध्ये आज नव्याने तीन कोरोना बाधित रुग्ण आढळले असून  या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या  व्यक्तींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यापाऱ्यांच्या संपर्कातील हे तीन जण आहेत. कुंभारी मधील विडी घरकुल येथील  दोन व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्या असल्याची माहितीही प्रांताधिकारी ज्योती पाटील यांनी दिली. सांगोला तालुक्यातील  निजामपूर  गावातील एक व्यक्ती  कोरोनाबाधित आढळला असून  हा परिसर  प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्याची कार्यवाही  सुरू असल्याची माहिती  सांगोल्याचे प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Threecorona : Akkalkot city, two in Kumbhari and one in Sangola