अरे व्वा ! बार्शीत हातमागावर तयार होतेय लाखाची पैठणी; टिपरे बंधूंनी साधली किमया 

Tipare
Tipare

बार्शी (सोलापूर) : साडी खरेदी म्हटलं, की महिलांना मोठे आकर्षण असते! आणि त्यातही पैठणी खरेदी करायची म्हटले तर त्यांचा यावर जीव की प्राण जडलेला असतो. तरुणींपासून विवाहितांपर्यंत प्रत्येकीस हवीहवीशी वाटणारी पैठणी बार्शीत हातमागावर तयार होत आहे. येथे तयार होणारी नऊ हजारांपासून ते एक लाख रुपयांपर्यंतची पैठणी पाहिल्यावर खरंच थक्क व्हायला होतं. ही किमया आहे, बार्शीतल्या टिपरे बंधूंची ! 

बार्शीतील अशोक टिपरे व शिवकुमार टिपरे या बंधूंना हातामागावर पैठणी तयार करण्याची कला अवगत असून, ते वर्षाला 20 ते 25 पैठणी महिलांच्या आवडीनुसार तयार करून पाच ते सहा लाख रुपयांचा व्यवसाय करीत आहेत. त्यांचा पारंपरिक कपडे विक्रीचा व्यवसाय होता. पण भांडवलाअभावी तो व्यवसाय बंद केला. बार्शी टेक्‍स्टाईल मिल, औद्योगिक वसाहत येथे या दोन्ही बंधूंनी काम करून उपजीविका करण्याचा प्रयत्न केला; पण व्यवसाय करण्याची मनामध्ये खूणगाठ होतीच. 

येवला (जि. नाशिक) येथे गीता विधाते व नीता दिवटे या त्यांच्या दोन्ही बहिणी. त्यांच्याकडे हातमागावर पैठणी तयार करण्याचा मोठा व्यवसाय आहे. तेथेच टिपरे बंधूंना पैठणी तयार करण्याचे पूर्ण शिक्षण मिळाले. त्यांनी बार्शी येथे घरातच दोन हातमाग तयार करून मागील सात वर्षांपासून पैठणी तयार करून विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. एक पैठणी तयार करण्यासाठी किमान एक ते दोन महिने लागतात. डिझाईननुसार वेळ लागतो आणि त्यानुसार किमतीमध्येही फरक पडतो. सकाळी आठ ते रात्री अकरापर्यंत त्यांचे काम सुरू असते. 

मोर, पोपट हे पक्षी पैठणीतील सर्वांत जास्त आकर्षण असते. पैठणीसाठी लागणारा कच्चा माल, दर्जेदार रेशीम ते येवला येथून खरेदी करतात. मुंबई, पुणे, बंगळूर, कर्नाटक, हुबळी येथून पैठणीसाठी महिलांच्या ऑर्डर त्यांच्याकडे येतात. ऑर्डरनुसार कुरिअरच्या माध्यमातून ते संबंधित महिलांना पैठणी पाठवतात. टिपरे बंधूंनी नऊ हजार, 20 हजार, 45 हजार, 65 हजार ते एक लाख रुपयांपर्यंतच्या पैठणींची आजपर्यंत विक्री केली आहे. 

आमची पैठणी बाजारपेठेत कोठेच मिळत नाही. बाजारपेठेतील पैठणी पॉवरलूमवर तयार केलेली असते. रेशीममध्ये कॉटनचा वापर होतो म्हणून त्यांची किंमत कमी असते. जरीच्या काठांमध्येही फरक असतो. हातमागावर तयार केलेली पैठणी उठावदार दिसते, असे त्यांचे म्हणणे आहे. 

टीव्हीवरील मालिकांसाठी पैठणींची ऑर्डर 
मुंबई, पुणे येथे ज्यावेळी प्रदर्शनात सहभाग घेतला त्यावेळी खूप महिलांनी ऑर्डर दिल्या. मंत्रालयातील महिला अधिकारी, मंत्री महोदय, आमदार यांनी घरी येऊन पैठणी खरेदी केल्या असून भविष्यात येत असलेल्या टीव्हीवरील नवीन मालिकेसाठी दिग्दर्शकाने 19 पैठणींची ऑर्डर दिली आहे, टिपेर बंधूंनी सांगितले. 

आमच्या व्यवसायात रक्षा अशोक टिपरे व अंजली शिवकुमार टिपरे अशा दोघी जणींची मदत होत आहे. त्यांना पैठणी तयार करण्याचे प्रशिक्षण दिले आहे. व्यवसायासाठी जागा खरेदी केली आहे. महिलांना प्रशिक्षण देणार असून त्यांना स्वतःच्या पायावर उभा करून मोठा उद्योग उभारण्याचा मानस आहे. 
- अशोक टिपरे व शिवकुमार टिपरे 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com