esakal | जयवंतराव जगताप यांची राष्ट्रवादीशी जवळीक चर्चेचा विषय 
sakal

बोलून बातमी शोधा

Topic of discussion for Jayawantrao Jagtap's closeness to NCP

जयवंतराव जगताप यांनी विधानसभा निवडणुकीत आमदार संजय शिंदे यांचा प्रचार केला. आमदार शिंदे यांच्या विजयात जगताप यांचा महत्त्वाचा वाटा आहे. आज जरी संजय शिंदे राष्ट्रवादीत नसले तरी त्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी असलेले घनिष्ठ संबंध जगजाहीर आहेत. शिवाय करमाळ्याच्या राजकारणात आमदार संजय शिंदे हे जगतापांना विचारात घेत आहेत. त्यामुळेच जयवंतराव जगताप यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी झालेल्या भेटीला विशेष महत्त्व निर्माण झाले आहे. 

जयवंतराव जगताप यांची राष्ट्रवादीशी जवळीक चर्चेचा विषय 

sakal_logo
By
अण्णा काळे

करमाळा (सोलापूर) : करमाळ्याचे माजी आमदार व बाजार समितीचे माजी सभापती जयवंतराव जगताप यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची नुकतीच गोविंदबाग (बारामती) येथे भेट घेतली. करमाळा तालुक्‍याच्या राजकारणात आमदार संजय शिंदे व श्री. जगताप यांची असलेली जवळीक आणि जगताप व पवार यांची भेट या मागे काहीतरी गुप्ती नक्की आहे. यापुढे आपण शरद पवारसाहेबांच्या विचाराने काम करणार असल्याचेही माजी आमदार जयवंतराव जगताप सांगत आहेत. त्यामुळे ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. 
सोलापूर जिल्ह्यातील कॉंग्रेसचे मोठे प्रस्थ असलेले कै. नामदेवराव जगताप यांचे जयवंतराव जगताप हे चिरंजीव आहेत. जयवंतराव जगताप हे 1990 ला पहिल्यांदा अपक्ष आमदार झाले. 1995, 1999 ला ते कॉंग्रेसकडून लढले. 1999 ला राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर ते राष्ट्रवादीकडून लढण्यास इच्छुक होते. मात्र 1999 ला नारायण पाटील यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली. दोनवेळा कॉंग्रेसकडून लढून पराभव झाल्यानंतर ते 2004 साली ते शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडून आले. 2004 ला त्यांनी तत्कालीन माजी राज्यमंत्री कै. दिंगबरराव बागल यांचा पराभव केला होता. त्यानंतर 2009 ला ते समाजवादी पक्षाकडून तर 2014 ला कॉंग्रेसकडून विधानसभा लढले. या दोन्ही निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत जयवंतराव जगताप यांनी भाजपचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार केला होता. यावेळी जगताप हे मोहिते-पाटील यांच्याशीही जवळीक साधून होते. याचवेळी त्यांचे चिरंजीव शंभुराजे जगताप यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. तर विधानसभा निवडणुकीत आमदार संजय शिंदे यांचा प्रचार केला होता. त्यामुळे पवार-जगताप भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहेत. 
राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडून रशमी बागल या शिवसेनेत गेल्या तर राष्ट्रवादीकडून लोकसभा लढलेले आमदार संजय शिंदे यांनी विधानसभेला मात्र अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. यावेळी राष्ट्रवादीकडून माजी आमदार नारायण पाटील यांनाही उमेदवारीसाठी विचारणा झाली होती. मात्र त्यांनीही अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. परिणामी करमाळा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला बालेकिल्ल्यात तगडा उमेदवार मिळाला नाही. राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेल्या रश्‍मी बागल, दिग्विजय बागल हे कारखान्याच्या अडचणीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटत आहेत. बागल ही पुन्हा राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या वावड्या उडत असल्या तरी ताला कोणीही अधिकृत दुजोरा देत नाही. 
सध्या करमाळा तालुक्‍यातील एकही बडा नेता राष्ट्रवादीत नाही. त्यामुळे ही पोकळी भरून काढण्यासाठी जयवंतराव जगताप राष्ट्रवादीत प्रवेश करणार काय? याविषयी उलटसुलट चर्चा रंगली आहे. करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडीच्या वेळी मकाईचे अध्यक्ष दिग्विजय बागल, बाजार समितीचे सभापती शिवाजी बंडगर यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेत जयवंतराव जगताप यांच्यासह त्यांच्या दोन मुलांवर 307 चा गुन्हा दाखल आहे. एकीकडे जगताप यांची बाजार समितीची सत्ता गेली तर दुसरीकडे गुन्हे दाखल झाले. त्यानंतर त्यांना अटकपूर्व जमीनसाठी अनेक महिने बाहेर फिरावे लागले. 
जयवंतराव जगताप यांनी विधानसभा निवडणुकीत आमदार संजय शिंदे यांचा प्रचार केला. आमदार शिंदे यांच्या विजयात जगताप यांचा महत्त्वाचा वाटा आहे. आज जरी संजय शिंदे राष्ट्रवादीत नसले तरी त्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी असलेले घनिष्ठ संबंध जगजाहीर आहेत. शिवाय करमाळ्याच्या राजकारणात आमदार संजय शिंदे हे जगतापांना विचारात घेत आहेत. त्यामुळेच जयवंतराव जगताप यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी झालेल्या भेटीला विशेष महत्त्व निर्माण झाले आहे. 

संपादन : वैभव गाढवे