शाळकरी मुलीस प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार 

सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

नोकरीनिमित्त आईवडील बाहेर गेल्याची संधी साधून जबरदस्तीने घरी प्रवेश करून अल्पवयीन मुलीस फेसबुकवर अकाउंट उघडायला लावले. त्यावरून जवळीक साधत शाळकरी मुलीस प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे आक्षेपार्ह छायाचित्र मैत्रिणींना दाखवण्याची धमकी देत पीडित मुलीवर अत्याचार केल्याची घटना सांगोला येथे घडली आहे.

सांगोला (जि. सोलापूर) : नोकरीनिमित्त आईवडील बाहेर गेल्याची संधी साधून जबरदस्तीने घरी प्रवेश करून अल्पवयीन मुलीस फेसबुकवर अकाउंट उघडायला लावले. त्यावरून जवळीक साधत शाळकरी मुलीस प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे आक्षेपार्ह छायाचित्र मैत्रिणींना दाखवण्याची धमकी देत पीडित मुलीवर अत्याचार केल्याची घटना सांगोला येथे घडली आहे.

याप्रकरणी सुधीर राजेंद्र कोकरे (रा. ब्रह्मपुरी, सध्या सांगोला) याच्यावर सांगोला पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 
या प्रकरणातील आरोपी सुधीर कोकरे याने अल्पवयीन मुलीस काहीही कळत नसल्याचा गैरफायदा घेऊन ऑक्‍टोबर 2019 पासून पीडित मुलीला फेसबुकवर अकाऊंट उघडायला लावले होते. या अकाउंटवर तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून ती स्वीकारायला लावली. पीडित अल्पवयीन मुलीशी जवळीक साधत तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून आणि विश्‍वासात घेऊन तिचे आक्षेपार्ह छायाचित्र स्वतःच्या मोबाईलमध्ये काढून घेतले.

आक्षेपार्ह छायाचित्र पालकांना व पीडित मुलीच्या मैत्रिणींना दाखवून समाजात तिची बदनामी करण्याची धमकी देऊन 23 जानेवारीला दुपारी दीडच्या सुमारास मुलीच्या घरी येऊन पीडित मुलीची इच्छा नसताना तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. एवढ्यावरच न थांबता आरोपी कोकरे याने पुन्हा 5 व 7 फेब्रुवारीला घरात मुलीचे आईवडील नसताना येऊन पीडित मुलीस तिचे काढलेले लज्जा वाटेल असे छायचित्र दाखवून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पीडित मुलीने त्याला प्रखर विरोध केला असता कोकरे हा तुला बघून घेतो अशी धमकी देऊन निघून गेला.

सुधीर कोकरे याच्याविरोधात सांगोला पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक हुले करत आहेत. 

युवक आत्महत्याप्रकरणी ढवळसच्या दोघांवर गुन्हा 
कुर्डू (जि. सोलापूर) ः शाळेतील मुलीला घड्याळ का दिले? तिचा अन्‌ तुझा काय संबंध म्हणून निमगाव टें. शाळेत बोलावून रोहिदास सुरवसे, चरण शिंदे यांनी माझ्या मुलाला त्याच्या मित्रासमोर लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करून अपमानित केले. त्यामुळेच माझा मुलगा मनोज जोतिराम दबडे (वय 18) याने आत्महत्या केल्याची फिर्याद मृत युवकाचे वडील जोतिराम संपत दबडे (वय 43, रा. ढवळस, वडाचीवाडी) यांनी कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यावरून दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
याबाबत सविस्तर माहिती अशी, की गुरुवारी ढवळस-वडाचीवाडी हद्दीत स्वत:च्या शेतात मनोज जोतिराम दबडे (वय 18) या युवकाने फवारणीचे औषध पिऊन आत्महत्या केली होती. तो निमगाव टें. येथील विठ्ठलराव शिंदे महाविद्यालय येथे बारावीत शिक्षण घेत होता. 12 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7.30च्या दरम्याण निमगाव टें. येथील जिल्हा परिषद मराठी शाळा येथे शिवराज कुंभार, अजित चट्टे, अविनाश पवार, अभिजित देवकर यांच्यासमोर रोहिदास सुरवसे, चरण शिंदे यांनी मारहाण करून अपमानित केल्याने व पोलिसांत तक्रार केली तर जीवे मारण्याची धमकी दिल्यानेच माझ्या मुलाने आत्महत्या केली असल्याचे जबाबात म्हटले आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याने रोहिदास सुरवसे, चरण शिंदे यांच्यावर कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अल्पवयीन मुलींचे अपहरण 
मंगळवेढा (जि. सोलापूर) ः शहर व ग्रामीण भागातील दोन अल्पवयीन मुलींना लग्नाचे आमिष दाखवून अपहरण करण्यात आले. याबाबतची फिर्याद दाखल झाली आहे. तालुक्‍यातील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून परमेश्‍वर शास्त्री व श्‍याम (पूर्ण नाव माहीत नाही, रा. नाशिक) या दोघांनी पळवून नेल्याची फिर्याद मुलीच्या वडिलांनी दिली आहे. दुसऱ्या घटनेत अल्पवयीन मुलीचे वडील रेशन आणण्यासाठी गेले असता त्या संधीचा गैरफायदा घेत अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद मुलीच्या वडिलांनी दाखल केली आहे. 

महाराष्ट्र
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Torture by pulling a schoolgirl into a trap of love