अतिवृष्टीमुळे वाहून गेलेल्या पुलावरून उसाने भरलेला ट्रॅक्‍टर कोसळला ! ग्रामस्थांमधून संताप 

हुकूम मुलाणी 
Thursday, 14 January 2021

ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बावची येथील ओढ्यावरील पुलाची एक बाजू वाहून गेल्यामुळे हा पूल धोकादायक बनला होता. परंतु याच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे बुधवारी (ता. 13) ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्‍टर ट्रॉलीसह पुलावरून कोसळला.

मंगळवेढा (सोलापूर) : ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बावची येथील ओढ्यावरील पुलाची एक बाजू वाहून गेल्यामुळे हा पूल धोकादायक बनला होता. परंतु याच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे बुधवारी (ता. 13) ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्‍टर ट्रॉलीसह पुलावरून कोसळला. यात चालक ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे बचावला असून, त्यास किरकोळ दुखापत झाली आहे. 

ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे नुकसान झाले. यात मंगळवेढा ते बोराळे, मंगळवेढा - खोमनाळ - निंबोणी, निंबोणी ते पौट, मरवडे ते सलगर बु, लवंगी, निंबोणी - चिक्कलगी - मारोळी, मंगळवेढा - पाटखळ - खुपसंगी यासह अनेक रस्त्यांचे नुकसान झाले. यात सर्वांत जास्त नुकसान बावची येथील पुलाचे झाले. शिरनांदगी तलाव भरून जादा झालेल्या पावसाच्या पाण्याने ओढ्यातील पुलाची एक बाजू वाहून गेली. त्या वेळी "सकाळ'ने वृत्त प्रसिद्ध करून संबंधित खात्याला जागे करण्याचा प्रयत्न केला. 

या मार्गावर साखर कारखान्याकडे जाणारी वाहतूक जास्त असताना सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी पुलाच्या तुटलेल्या बाजूकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले. 
पुलाच्या दुरुस्तीसाठी किती बळींची वाट हे खाते पाहणार, असा सवाल विचारला जात असताना, बुधवारी (ता. 13) लवंगी येथील साखर कारखान्याला ऊस भरून जात असताना ट्रॅक्‍टर व एक उसाने भरलेली ट्रॉली अचानक या पुलावरील तुटलेल्या बाजूचा अंदाज न आल्याने पलटी झाली. 

याच ओढ्यालगत बुधवारी गावातील एका मृतदेहावर अंत्यविधी सुरू होता. या ठिकाणी उपस्थित ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेत ट्रॅक्‍टर चालकाच्या अंगावर पडलेला ऊस बाजूला करून त्याला बाहेर काढण्यात आले. उपचारासाठी ट्रॅक्‍टर चालकाला दवाखान्यात पाठवण्यात आले. हा चालक तालुक्‍यातील देगाव येथील आहे. दरम्यान, या घटनेने तरी संबंधित खात्याला जाग येईल का, अशी विचारणा घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी व्यक्त केली. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A tractor loaded with sugarcane fell off a bridge that was swept away by heavy rains