
पंढरपूर (जि. सोलापूर) : कोरोनाच्या संदर्भातील सद्यस्थिती पहाता प्रमुख पालख्या अगदी मोजक्या वारकऱ्यांच्या समवेत पंढरपूरकडे मार्गक्रमण करत आल्या तरी ठिकठिकाणी होणारे मुक्काम, तिथे दर्शनासाठी होणारी गर्दी यामुळे पोलिस आणि अन्य यंत्रणेवर ताण येण्याची शक्यता आहे. या गोष्टी लक्षात घेऊन पालख्या कुठेही मुक्काम न करता थेट पंढरपूरला वाहनातून आणून परंपरा अबाधित ठेवावी, अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.
यंदा आषाढी यात्रा एक जुलै रोजी आहे. दरवर्षी आषाढी यात्रेसाठी राज्याच्या विविध भागातून पायी दिंड्या पंढरपूरला येत असतात. सध्याच्या परिस्थितीत पालखी सोहळ्याची परंपरा अबाधित राहणार की नाही या विषयी संभ्रम आहे.
बुधवारी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या पदाधिकाऱ्यांच्या सोबत येथील काही प्रमुख महाराज मंडळीनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे चर्चा केली. दहा-बारा मोजक्या वारकऱ्यांच्या समवेत पालखी पंढरपूरला आणावी. शासनाच्या सर्व सूचना मान्य करुन गरज पडल्यास सोहळ्यातील परंरागत मार्ग बदलून अन्य मार्गाने आणि परंपरागत मुक्कामाची ठिकाणे व दिवस कमी करून पालखी पंढरपूरला आणण्यात यावी, अशा आशयाची चर्चा यावेळी झाली.
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत निवृत्तीनाथ, संत सोपानकाका, संत एकनाथ, संत नामदेव, संत मुक्ताबाई या प्रमुख सात संतांच्या पालख्या ठरलेल्या दिवशी पंढरपूरला प्रस्थान करतील. परंपरा खंडित होणार नाही. फक्त या सोहळ्याचे स्वरुप शासनाशी चर्चा करून ठरवले जाणार आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी सर्व प्रकारची काळजी घेतली जाणार आहे, असे वारकरी पाईक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील प्रमुख मानकरी राणा महाराज वासकर यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, पालखी सोहळ्याचा परंपरागत मार्ग बदलला आणि अगदी पाच-सात लोकांच्या समवेत जरी या पालख्या पंढरपूरकडे निघाल्या तरी जिथे जिथे या पालख्या मुक्कामास थांबतील तिथे तिथे पोलिस बंदोबस्तासह सर्व यंत्रणेला लक्ष द्यावे लागेल. मुक्कामाच्या ठिकाणाच्या विषयी गुप्तता ठेवली तरी मोबाईल मुळे आता त्या त्या भागातील लोकांना वेगाने माहिती मिळून लोक पालखीच्या दर्शनासाठी गर्दी करण्याची शक्यता आहे.
प्रस्थानाच्या वेळची राज्यातील परिस्थिती पाहून केवळ परंपरा खंडीत होऊ नये यासाठी सात प्रमुख संतांच्या पालख्या मोजक्या मानकऱ्यांच्या समवेत वाहनातून थेट पंढरपूरला आणाव्यात. पंढरपूर मधील परंपरागत धार्मिक विधी करुन पुन्हा त्या परतीच्या प्रवासासाठी मार्गस्थ कराव्यात, अशा प्रतिक्रिया विविध क्षेत्रातील मान्यवरांमधून व्यक्त होत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.