शुगर बेल्टमध्ये गाळप हंगामासाठी ट्रेलर दुरुस्तीला आला वेग 

प्रदीप बोरावके
Thursday, 10 September 2020

माळीनगर येथील वर्कशॉप मेकॅनिक पंजाबराव शिंदे म्हणाले, गेली दहा वर्षांपासून वर्कशॉपमध्ये ट्रेलरची विविध कामे करत आहे. साखर कारखाने सुरू होण्यापूर्वी तीन महिने अगोदर ट्रेलरची कामे चालू होतात. 

माळीनगर (सोलापूर) : साखर कारखान्यांचा गाळप हंगाम महिनाभरावर येऊन ठेपल्याने ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्‍टरच्या ट्रेलर दुरुस्तीच्या कामांना सध्या वेग आला आहे. 
गतवर्षी दुष्काळामुळे सोलापूर जिल्ह्यात उसाची उपलब्धता कमी होती. त्यामुळे गाळप हंगाम घेणाऱ्या साखर कारखान्यांची संख्या देखील बोटावर मोजण्याइतकीच होती. मात्र, यंदाच्या हंगामासाठी मुबलक ऊस उपलब्ध आहे. जिल्ह्यात 33 हून अधिक कारखाने आहेत. परिणामी गाळप हंगाम घेणाऱ्या कारखान्यांच्या संख्येत यंदा निश्‍चितच वाढ होणार आहे. त्यादृष्टीने कारखाने तयारी करीत आहेत. अनेक कारखान्यांनी मिल रोलरचे पूजन करून गाळपास सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे. 
साखर कारखान्यांची ऊसवाहतूक मोठ्या प्रमाणात प्रामुख्याने ट्रॅक्‍टरच्या ट्रेलरने होते. यंदाचा गाळप हंगाम उंबरठ्यावर आल्याने ट्रॅक्‍टरमालक ट्रेलर दुरुस्तीची कामे करून घेण्यात व्यस्त आहेत. सध्या वर्कशॉपमध्ये ट्रेलरची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. काही ट्रॅक्‍टरमालक नवीन ट्रेलर बनवून घेण्यास प्राधान्य देत आहेत. अनेकजण जुन्या ट्रेलरची दुरुस्ती करून घेताना दिसत आहे. 
वर्कशॉपमध्ये नवीन ट्रेलर तयार करणे, त्यास रंग देणे, फिटिंग करणे ही कामे गतीने सुरू आहेत. ट्रेलरचे ऍक्‍सल फिटिंग, स्प्रिंग फिटिंग, टायर फिटिंग, नवीन चेसी बनविणे या कामात कामगार मग्न आहेत. 
माळीनगर येथील वर्कशॉप मेकॅनिक पंजाबराव शिंदे म्हणाले, गेली दहा वर्षांपासून वर्कशॉपमध्ये ट्रेलरची विविध कामे करत आहे. साखर कारखाने सुरू होण्यापूर्वी तीन महिने अगोदर ट्रेलरची कामे चालू होतात. 
ट्रक्‍टर मालक सोमनाथ सातव म्हणाले, तीन ट्रॅक्‍टर ऊस वाहतुकीसाठी लावले आहेत. ट्रेलरची हाफ ग्रीसिंग, टेबल ग्रीसिंग व पाटा ग्रीसिंगची कामे चालू आहेत. 

संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Trailer repair for the crushing season in the Sugar Belt has gained momentum