एसटीतून शेतीमालाची वाहतूक; पंढरपूर आगारात 100 बस सज्ज 

भारत नागणे 
सोमवार, 25 मे 2020

मागणीनुसार सोडणार बस 
पंढरपूर आगाराने शेतीमाल वाहतुकीची तशी तयारी देखील केली आहे. येथील आगारात सुमारे 100 बस गाड्या उभ्या आहेत. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सर्वच्या सर्व गाड्या शेतीमाल वाहतूकीसाठी उद्यापासून उपलब्ध करुन दिल्या जातील, असेही आगार व्यवस्थापक श्री, सुतार यांनी सांगितले. 

पंढरपूर (जि. सोलापूर) : प्रवाशी वाहतूक करणारी एसटी आता शेती मालाची वाहतूक करणार आहे. मंगळवापासून शेतकऱ्यांनी तशी मागणी केली तर शेतीमालासाठी बस उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. पंढरपूर आगारात 100 बस शेतीमाल वाहतुकीसाठी तयार ठेवल्या आहेत, अशी माहिती येथील आगार व्यवस्थापक सुधीर सुतार यांनी आज सकाळ शी बोलताना दिली. 
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एसटी महामंडळाने 22 मार्चपासून राज्यातील सर्व प्रवाशी वाहतूक थांबवली होती. त्यानंतर दोन महिन्यांनी लॉकडाउऩ शिथिल झाल्यानंतर पुन्हा राज्य परिवहन महामंडळाने 22 मेपासून जिल्हा अंतर्गत प्रवाशी वाहतूक सुरु केली आहे. परंतु राज्यभरात शाळा, महाविद्यालये आणि विवाह सोहळे साजरे करण्यावर बंदी कायम असलेल्यामुळे प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे चार दिवसांनंतर एसटी महामंडळाने आता प्रवाशी वाहतुकीबरोबरच शेतीमालाची वाहतूक करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 
प्रवाशी वाहतूक बंद असल्यामुळे राज्यभरातील शेकडो बस जागेवरच थांबून आहेत. वाहक व चालकही घरीच आहेत. अशा परिस्थितीमध्ये एसटीचा तोटा कमी करण्यासाठी काही प्रमाणात प्रवाशी वाहतूक सुरु केली. पण प्रवाशी वाहतुकीला अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याने राज्यातील बहुतांश आगारांना तोटाच सहन करावा लागत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे परिवहन महामंडळाने तोटा कमी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांची सोय करण्यासाठी शेतीमालाची वाहतूक बाजारपेठेपर्यंत करण्याचा निर्णय घेतल आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Transport of agricultural produce from ST 100 buses ready at Pandharpur depot