दाराशा, होटगी आरोग्य केंद्र, अकलूज ग्रामीण रुग्णालय येथे कोरोना लसीकरणाची शुक्रवारी रंगीत तालीम 

प्रमोद बोडके 
Thursday, 7 January 2021

जिल्ह्यात आरटीपीसीआरद्वारे होणाऱ्या कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्याची सूचना मुख्यमंत्री यांचे सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केली आहे. त्यानुसार जिल्ह्यात आता आरटीपीसीआरच्या चाचण्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे. कोरोना कालावधीत काम केलेल्या आरोग्य यंत्रणेतील तीस हजार जणांना पहिल्या टप्प्यात लस दिली जाणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील बूथची निर्मिती केली जाणार आहे. 

सोलापूर : सोलापूर शहरातील दाराशा नागरी आरोग्य केंद्र, होटगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि अकलूज येथील ग्रामीण रुग्णालय येथे कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम घेतली जाणार आहे. शुक्रवारी (ता. 8) ही रंगीत तालीम होणार असून त्यानंतर प्रत्यक्ष लसीकरणासाठी आवश्‍यक असलेल्या सुधारणा केल्या जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. 

जिल्ह्यात आरटीपीसीआरद्वारे होणाऱ्या कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्याची सूचना मुख्यमंत्री यांचे सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केली आहे. त्यानुसार जिल्ह्यात आता आरटीपीसीआरच्या चाचण्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे. कोरोना कालावधीत काम केलेल्या आरोग्य यंत्रणेतील तीस हजार जणांना पहिल्या टप्प्यात लस दिली जाणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील बूथची निर्मिती केली जाणार आहे. एका बूथवर शंभर व्यक्तींच्या लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. ही लस कोणालाही बंधनकारक करण्यात आली नसल्याचेही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले. लसीकरण झाल्यानंतर त्या व्यक्तीला अर्धा तास डॉक्‍टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

ज्या डीसीएचसी व डीसीएचमध्ये कोरोनाबाधित रुग्ण नाहीत, ते हॉस्पिटल नॉन कोव्हिड रुग्णांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. 
- मिलिंद शंभरकर, 
जिल्हाधिकारी 

जिल्ह्यात कोरोना दाखल झाल्यापासून ते कोरोनाचा प्रभाव कमी होईपर्यंतची सर्व माहिती एकत्रित करण्याच्या सूचना डॉ. दीपक म्हैसेकर यांनी बैठकीत दिल्या आहेत. त्यानुसार सोलापूर जिल्ह्याचे डॉक्‍युमेंटेशन केले जाणार आहे. 
- दिलीप स्वामी, 
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A trial of the corona vaccination will be held on Friday in Solapur