माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना वाहिली जिल्ह्यातील मान्यवरांनी आदरांजली 

अरविंद मोटे 
Tuesday, 1 September 2020

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी श्रद्धांजली वाहताना म्हणाले, प्रणव मुखर्जी जेव्हा राष्ट्रपती म्हणून निवडून गेले, तेव्हा लोकसभेत रिक्त झालेल्या लोकसभेचा नेता या त्यांच्या जागी माझी लोकसभेचा नेता म्हणून निवड झाली. तसेच ग्रुप ऑफ मिनिस्टर मंत्रिगटाच्या जवळपास चाळीस-पन्नास बैठका होत असत, त्या वेळी ते प्रमुख म्हणून मार्गदर्शक असायचे. अनेक संकटांच्या प्रसंगी बैठकांमध्ये चर्चा करून प्रश्न सोडवण्यासाठी मार्ग काढून द्यायचे. 

सोलापूर : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल जिल्ह्यातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला. संसदेत त्यांच्याबरोबर काम केलेल्या नेत्यांनी "सकाळ'शी बोलताना दु:ख व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहिली. 

राजकारणाची आणि घडामोडीची माहिती असणारा नेता
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी श्रद्धांजली वाहताना म्हणाले, प्रणव मुखर्जी जेव्हा राष्ट्रपती म्हणून निवडून गेले, तेव्हा लोकसभेत रिक्त झालेल्या लोकसभेचा नेता या त्यांच्या जागी माझी लोकसभेचा नेता म्हणून निवड झाली. तसेच ग्रुप ऑफ मिनिस्टर मंत्रिगटाच्या जवळपास चाळीस-पन्नास बैठका होत असत, त्या वेळी ते प्रमुख म्हणून मार्गदर्शक असायचे. अनेक संकटांच्या प्रसंगी बैठकांमध्ये चर्चा करून प्रश्न सोडवण्यासाठी मार्ग काढून द्यायचे. त्यामुळे त्यांचा खूप मोठा आधार वाटायचा. हुशार असणारा हा नेता होता. संपूर्ण देशाची, राजकारणाची आणि घडामोडीची माहिती असणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. 

असे व्यक्तिमत्त्व पुन्हा होणे नाही
माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील म्हणाले, माझ्या राजकीय जीवनातील आदर्श व्यक्तिमत्त्व आज हरपले आहे. ते निश्‍चितच बरे होतील, अशी खात्री होती. परंतु, ईश्वरी सत्तेपुढे इलाज नाही. प्रचंड अभ्यासू, शांत, चारित्र्यवान असे व्यक्तिमत्त्व होते. सर्व पक्षांत त्यांचे संबंध मैत्रिपूर्ण होते. असे व्यक्तिमत्त्व पुन्हा होणे नाही. भावपूर्ण श्रद्धांजली. 

कॉंग्रेस पक्षात निश्‍चितपणे पोकळी निर्माण झाली
माजी खासदार धर्मण्णा सादूल म्हणाले, मुत्सद्दी व मुरब्बी राजकारणी म्हणून माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे पाहिले जायचे. त्यांच्या मनात सतत देशाच्या विकासाचेच विचार होते. कॉंग्रेसला अडचणीच्या काळात वेळोवेळी मदत करून ते अनेकदा संकटमोचक बनले. त्यांच्या अनुभवाचा अनेकदा पक्षाला लाभही झाला. त्यांच्या निधनाने कॉंग्रेस पक्षात निश्‍चितपणे पोकळी निर्माण झाली आहे. 

भारताचे राष्ट्रपती म्हणून ते विश्‍वात शोभून दिसत होते
माजी खासदार शरद बनसोडे म्हणाले, प्रणव मुखर्जी यांनी देशाचे राष्ट्रपती, अर्थमंत्री आणि परराष्ट्र मंत्री म्हणून उत्कृष्ठ काम केले आहे. परराष्ट्र धोरणात खूप मोठे बदल त्यांच्यामुळे झाले आहेत. तत्कालिन स्थितीत देशाची आर्थिक घडीही त्यांनी बसविली आहे. भारताचे राष्ट्रपती म्हणून ते विश्‍वात शोभून दिसत होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tribute by dignitaries of Solapur to former president Pranab Mukherjee