भारीच की..! शिक्षिकांनी नेली माता पालकांची सहल

Parents Trip of Solapur
Parents Trip of Solapur

सोलापूर : विद्यार्थ्यांसाठी सहलीचे आयोजन सर्वच शाळांमध्ये होते, पण शाळेच्या माता पालकांसाठी तसेच शाळेच्या परिसरात घरकाम करणाऱ्या महिलांसाठी सोलापुरातील महिला शिक्षिकांनी एकदिवसीय सहल यशस्वीरीत्या पार पाडली.
शांतिनगर येथील देवराज प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका आशाराणी डोके यांनी महिला शिक्षिकांना सोबत घेऊन स्थापन केलेल्या ऍचिव्हर्स महिला असोसिएशनच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला. या संघटनेच्या माध्यमातून घरकाम करणाऱ्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. याचाच भाग म्हणून वर्षातून एकदा या महिलांना सोबत घेऊन सहलीचे आयोजन केले जाते. यंदा कर्नाटकातील अलमट्टी धरण, रॉक गार्डन, कुडल संगम शिवलिंग दर्शन आदी ठिकाणी भटकंती करण्यात आली.

उपक्रमाबद्दल संस्थेचे कौतुक
शिक्षकांसोबतच्या सहलीने उपेक्षित महिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आशाराणी डोके यांच्यासोबत उपाध्यक्ष लक्ष्मी इराबत्ती, सचिव शीतल ठाकूर, संतोषी बिरादार, नरसम्मा सारोळे, शशिकला सातपुते, सरस्वती मते, गंगूबाई कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले. या उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नागनाथ सुरवसे, उपाध्यक्ष श्रीपाद सुरवसे, संजीवनी पडवळकर, सारिका माने आदींनी कौतुक केले आहे.

आईच्या सहलीसाठी मुलांची धडपड
या सहलीसाठी निम्मा खर्च महिलांकडून घेण्यात आला तर बाकीचा खर्च संघटनेच्या माध्यमातून करण्यात आला. विशेष म्हणजे देवराज शाळेतील काही मुलांनी आपली आई सहलीला जावी म्हणून काम करून मिळालेले पैसे शिक्षकांकडे जमा केले. आईच्या सहलीसाठी मुलांनी केलेली धडपड कौतुकास्पद असल्याचे शिक्षकांनी सांगितले.


घरकाम करणाऱ्या महिला तसेच कामगार वर्गातील माता पालकांचे जीवनमान धावपळीचे आहे. त्यांच्यासाठी आम्ही विविध उपक्रम राबवत आहोत. यातून वेगळे समाधान मिळते. कर्नाटक परिसरात आयोजिलेल्या सहलीमुळे सर्वांना आनंदी जगण्याची प्रेरणा मिळाली आहे.
- आशाराणी डोके, मुख्याध्यापिका, देवराज प्राथमिक शाळा

शहराच्या हद्दवाढ भागात कामगारांचे प्रमाण मोठे आहे. रोजच्या धावपळीतून त्यांना स्वत:साठी बाहेर फिरायला जाणे शक्‍य होत नाही. म्हणून ऍचिव्हर्स महिला संघटनेने राबविलेल्या उपक्रमातून आम्हाला स्वतःच्या हक्कांची जाणीव झाली व स्वाभिमानाने जगण्यासाठी मूलमंत्र मिळाला.
- जयश्री कट्टीमनी, पालक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com