मार्चपासून बंद असलेले पंढरपुरातील तुळशी वृंदावन आजपासून भाविकांसाठी खुले 

भारत नागणे 
Tuesday, 1 December 2020

पंढरपूरच्या वैभवात भर टाकणारे येथील तुळशी वृंदावन मंगळवार (ता. 1) पासून शहरातील नागरिक व विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे. सकाळी 8 ते रात्री 9 वाजेपर्यंत पर्यटक भाविक व शहरातील नागरिकांना वृंदावनात प्रवेश देण्यात येईल. दरम्यान, प्रवेश शुल्कात वाढ करण्यात आली असून लहान मुलांसाठी 15 तर मोठ्यांसाठी 20 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. 

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूरच्या वैभवात भर टाकणारे येथील तुळशी वृंदावन मंगळवार (ता. 1) पासून शहरातील नागरिक व विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे. सकाळी 8 ते रात्री 9 वाजेपर्यंत पर्यटक भाविक व शहरातील नागरिकांना वृंदावनात प्रवेश देण्यात येईल. दरम्यान, प्रवेश शुल्कात वाढ करण्यात आली असून लहान मुलांसाठी 15 तर मोठ्यांसाठी 20 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. 

सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळूनच तुळशी वृंदावनात प्रवेश देण्यात येईल, अशी माहिती उपवन संरक्षक अधिकारी धैर्यशील पाटील व पंढरपूरचे वन परिक्षेत्र अधिकारी विलास पवळे यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील तुळशी वृंदावन मार्च महिन्यापासून बंद आहे. 

दरम्यान, राज्य शासनाने मंदिरे, शाळा आणि इतर सर्व आस्थापने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार येथील तुळशी वृंदावन देखील आजपासून भाविक आणि पंढरपूर शहरातील नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहे. 

येथील यमाई तलावाच्या निसर्गरम्य परिसरात वनविभागाच्या वतीने तुळशी वृंदावनाची उभारणी करण्यात आली आहे. विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आपला काही वेळ शांतपणे आणि निसर्गाच्या सान्निध्यात घालवता यावा, त्याचबरोबर विविध संतांच्या चरित्राविषयी माहिती मिळावी या हेतूने राज्य सरकारने तुळशी वृंदावनाची निर्मिती केली आहे. 

येथील वृंदावनामध्ये विविध प्रकारच्या तुळशीबरोबरच इतर अनेक फुलझाडांची लागवड करण्यात आली आहे. रंगीबेरंगी कारंजे आणि भव्यदिव्य अशा विठ्ठल मूर्तीचे रूप डोळ्यात साठवण्यासाठी अनेक भाविक येथे आवर्जून येतात. 

भाविकांच्या वाढत्या गर्दीमुळे येथील तुळशी वृंदावन पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध होऊ लागले आहे. नऊ महिन्यांपासून बंद असलेले तुळशी वृंदावन पुन्हा लोकांसाठी खुले होत असल्याने भाविक व शहरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. भाविकांनी व शहरातील नागरिकांनी तुळशी वृंदावन विहाराचा लाभ घ्यावा, असे आवाहन वन क्षेत्र अधिकारी श्री. पवळे यांनी केले आहे. 

प्रवेशासाठी नियमावली 

  • दहा वर्षांखालील लहान मुलांना प्रवेश बंदी 
  • 65 वर्षांवरील वृद्धांनाही सोडले जाणार नाही 
  • ज्यांच्या शरीराचे तापमान अधिक आहे, अशा लोकांनाही प्रवेश नाकारण्याचा अधिकार वनविभागाला आहे 
  • मास्क आणि सॅनिटायझरचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे 
  • कोरोनाचे सर्व नियम पाळूनच तुळशी वृंदावनामध्ये प्रवेश देण्यात येईल 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tulshi Vrindavan in Pandharpur has been opened for devotees from today