मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर आगारातून एसटीच्या बाराशे फेऱ्या रद्द ! 20 लाखांचा फटका 

भारत नागणे 
Friday, 6 November 2020

मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर एसटी आगारातून होणाऱ्या दिवसभरातील सुमारे 1200 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. याचा एसटीला जवळपास 20 लाखांचा आर्थिक फटका बसला आहे, अशी माहिती येथील आगार प्रमुख ए. एस. सुतार यांनी दिली. 

पंढरपूर (सोलापूर) : मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर एसटी आगारातून होणाऱ्या दिवसभरातील सुमारे 1200 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. याचा एसटीला जवळपास 20 लाखांचा आर्थिक फटका बसला आहे, अशी माहिती येथील आगार प्रमुख ए. एस. सुतार यांनी दिली. 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी शनिवारी पंढरपूर ते मंत्रालय असा दिंडी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी राज्यभरातून हजारो मराठा बांधव पंढरपुरात दाखल होत असतानाच, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी एसटीची प्रवासी वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आजपासून पंढरपुरातून आंतरराज्य आणि आंतरजिल्हा होणारी प्रवासी वाहतूक दोन दिवसांसाठी बंद ठेवण्यात आली आहे. 

ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर प्रवासी वाहतूक बंद ठेवल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली आहे. येथील आगारातून दिवसभरात सुमारे सहाशे गाड्या बाहेर जातात आणि तेवढ्याच बाहेरून येतात. याशिवाय राज्याबाहेरून एसटीची प्रवासी वाहतूक होते. आंदोलनामुळे येथील एसटीची सेवा ठप्प झाली आहे. यामध्ये एसटीला 20 लाख रुपयांचा फटका बसला आहे. आधीच कोरोनामुळे अडचणीत आलेल्या एसटीला विविध आंदोलनांचा फटका सहन करावा लागत आहे. 

शहरात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्‍यता असल्याने आज (शुक्रवारी) मध्यरात्री 12 पासून उद्या शनिवारी (ता. 7) रात्री 12 पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने लागू केलेल्या संचारबंदीचा मराठा समाजबांधवांनी निषेध करत संचारबंदीच्या आदेशाची ठिकठिकाणी होळी केली आहे. या पार्श्वभूमीवर आज दुपारी पंढरपुरात जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या समवेत मराठा क्रांती ठोक मोर्चा समन्वयकांची बैठक होणार आहे. बैठकीत कोणता तोडगा निघणार, याकडेच लक्ष लागले आहे. 

दरम्यान, पंढरपुरातून दिंडी मोर्चा काढण्याबाबत मराठा आंदोलक ठाम असून, अनेक मराठा कार्यकर्ते पंढरपुरात दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पंढरपुरात पोलिसांची जादा कुमक बोलावण्यात आली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twelve hundred rounds of ST from Pandharpur depot have been canceled causing a loss of Rs 20 lakh