mirchi new.jpg
mirchi new.jpg

वीस गुंठे हिरवी मिरची अन्‌ पाच लाखांचे उत्पादनः अनगर-कोंबडवाडी येथील उच्चशिक्षित सुवर्णा सरक यांची कामगिरी 

अनगर(सोलापूर): उच्चशिक्षित सुवर्णा सरक यांनी अवघ्या सव्वा महिन्यात वीस गुंठे क्षेत्रातील हिरव्या मिरचीतून घसघशीत पाच लाख रूपयांचे उत्पादन घेतले आहे. अनगर-कोंबडवाडी येथील इतिहास विषयात एम.ए. असलेल्या सुवर्णा विकास सरक यांनी आपल्या वीस गुंठे क्षेत्रातून कोरोना महामारीच्या संकटावर मात करत कल्पकतेने शेती करत कमी क्षेत्रात, कमी खर्चात, कमी पाण्यात भरघोस उत्पादनाचा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. 

पहिल्यापासूनच शेतीची असणारी आवड, स्पर्धा परीक्षेद्वारे यश मिळवूनही मंत्रालयात मिळणारी नोकरी शेतीच्या आवडीपोटी नाकारत त्यांनी अल्प असणाऱ्या आपल्या शेतीतून भरघोस उत्पादन घेत शेतीची असणारी आवड परिपूर्ण केली आहे. इतर काही तरी करण्यापेक्षा आपल्याच शेतात काही तरी वेगळे करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. 

याबद्दल सुवर्णा सरक यांनी सांगितले, की शिक्षक असलेल्या पतींनीही माझ्या या निर्णयाला पाठिंबा देत मार्गदर्शन व सहकार्य केले. थोड्या क्षेत्रात, थोढ्या खर्चात, थोड्या पाण्यात जास्त उत्पादन घेण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो. त्याचाच भाग म्हणून आम्ही हिरवी मिरची लावण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 20 गुंठे क्षेत्राची मशागत करून त्यामध्ये तीन ट्रॅक्‍टर ट्रॉली शेणखत टाकून बेड बनवून मलचिंग पेपरवर अनुष्का जातीच्या मिरची रोपांची लागवड ठिबक सिंचनाद्वारे केली. गरजेनुसार त्याला रासायनिक खतांचा डोस दिला. काढणीनंतरही मिरची निरोगी राखण्यासाठी मल्टीसी, बोरॉन, सिप्लेक्‍स यासारख्या औषधाची फवारणी केल्यामुळे झाडांना भरघोस मिरच्या लागून त्या अधिक चमकदार झाल्या. त्याची आठवड्यातून दोन ते तीन वेळा घरच्या घरीच तोडणी करुन मोहोळ आणि पुणे येथील बाजारपेठेत सर्वाधिक दराने त्या विकल्या. त्याला किलोला 45 रुपये एवढा दर मिळाला असून सध्या चालू असलेल्या नवरात्र सणामुळे हिरवी मिरचीला मागणी वाढलेली आहे. त्याला दरही चांगला येत असल्याचे सौ. सरक यांनी सांगितले. मिरची लागवड केल्यापासून अवघ्या सव्वामहिन्यात फक्त 60 हजार रूपये खर्चून उत्पादनला सुरवात झाली. साधारण 10 ते 15 टन माल निघून पाच लाख रुपयांचे घसघशीत उत्पादन आम्हाला मिरचीतून मिळाले आहे. लॉकडाउनच्या काळात सध्या शाळा, महाविद्यालये बंद असल्यामुळे याकामी पती विकास सरक, मुली समीक्षा व चैताली, सासूबाई सुमन यांचीही मोठी मदत झाली. श्री. कांबळे, अतुल घाटुळे, अमोल राठोड, नागार्जुन ग्रुपच्या सदस्यांचेही मार्गदर्शन लाभले असल्याचे त्यांनी सांगीतले. सुवर्णा सरक यांनी स्वतःच्या कल्पकतेने कमी क्षेत्रात, कमी खर्चातून, कमी पाण्यावर घेतलेले जास्त उत्पन्न सर्वांसाठी आदर्श ठरत आहे.  

संपादनः प्रकाश सनपूरकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com