अवघ्या एकवीस वर्षीय मुलानं ग्रामपंचायतीत भल्या-भल्या मातब्बरांना केली चारीमुंड्या चित ! सत्ताही आणली खेचून 

Ruturaj
Ruturaj

मोहोळ (सोलापूर) : आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण या आधुनिक विकासाचे व्हीजन डोळ्यासमोर ठेवून मोहोळ तालुक्‍यातील एक 21 वर्षीय तरुण ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने राजकारणात नव्या दमाचे सहकारी घेऊन उतरला व तो विजयीही झाला. त्याचीच चर्चा सध्या मोहोळ तालुक्‍यासह राज्यात होत असून, तो राज्यातील सर्वांत लहान व तरुण उमेदवार ठरला आहे. ग्रामीण भागातील नागरिकही आता विकासाला प्राधान्य देत असल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. 

घाटणे (ता. मोहोळ) येथील ऋतुराज रवींद्र देशमुख असे या युवकाचे नाव आहे. त्याने नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामस्थांना पारंपरिक आश्वासने न देता आधुनिक विकासाचे व्हीजन समोर ठेवून सात जागांवर स्वतःसह उमेदवार उभे केले व त्यापैकी पाच जागांवर विजयही प्राप्त केला. 

यासंदर्भात रवींद्र देशमुख याच्याशी संवाद साधला असता तो म्हणाला, आमच्या गावात 24 तासांपैकी 12 तास वीज उपलब्ध नसते. गावात दररोज दीड ते दोन हजार लिटर दूध संकलन होते, मात्र गावातील रस्ते खराब आहेत. गावात पाणी पिण्यासाठी हातपंप आहेत, पाण्याची टाकी उंच नाही. हातपंपाचे क्षारयुक्त पाणी पिल्याने अनेक गावकऱ्यांना मुतखड्याचा त्रास आहे आदी बाबींवर महत्त्व देत मी गावातील पाणंद रस्ते, पिण्याच्या पाण्यासाठी जलशुद्धीकरण यंत्रणा, महिला सबलीकरणासाठी विविध योजना, विजेच्या समस्येपासून कायमची सुटका होण्यासाठी सोलरयुक्त गाव, जिल्हा परिषद शाळा डिजिटल या सुविधा नागरिकांना देणार असल्याचे त्याने सांगितले. 

घाटणे येथे आरोग्य केंद्र नसून तेथे तीन खाटांचे आरोग्य केंद्र उभारून ग्रामस्थांना हेल्थ कार्ड उपलब्ध करून देणार आहे. हेल्थ कार्डचे सॉफ्टवेअर तयार करण्याचा मानस असून त्या माध्यमातून रोगाचे, आजाराचे निदान वेळेत होण्यास मदत होणार आहे. या सर्व आधुनिक विकासाचे व्हीजन समोर ठेवून मतदारांसमोर गेलो. त्यामुळे मला यश प्राप्त झाले. गावकऱ्यांनी दिलेल्या संधीचे सोने करेन. गावाकडील नागरिकही आता आरोग्य, शिक्षण, व्यवसाय, रोजच्या गरजा यांबाबत जागरूक झाले असल्याचे या निमित्ताने अधोरेखित तर झालेच, पण युवा वर्गही जुन्या राजकारण्यांना विकासाच्या मुद्द्यावर रोखून यश प्राप्त करू शकतात, हेही या निमित्ताने सिद्ध झाले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com