
रिक्तपदे भरण्याची आहे गरज
जिल्हा परिषदेतील महत्त्वाच्या विभागांमधील पदे रिक्त झाली आहेत. मागील काही वर्षांत वर्ग एक व वर्ग दोनची पदे भरली गेली नाहीत. त्यामुळे शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसह प्रशासकीय कामकाज करणे सोयीचे व्हावे म्हणून ही पदे तत्काळ भरावीत, असे पत्र शासनाला पाठविले आहे.
- दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सोलापूर जिल्हा परिषद
सोलापूर : जिल्हा परिषदेतील विविध विभागांमध्ये वर्ग एक व दोनमधील एक हजार 250 पदे रिक्त झाली आहेत. त्यामुळे प्रशासकीय कामकाज करताना आणि नागरिकांचे प्रश्न सोडविताना, शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावाणी करताना प्रभारी अधिकाऱ्यांवर ताण येत आहे. या पार्श्वभूमीवर ही रिक्तपदे तत्काळ भरावीत, असे विनंतीपत्र मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी शासनाला व पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना दिले आहे. मात्र, त्यानुसार काहीच कार्यवाही न झाल्याने जिल्हा परिषदेने आता शासनाला स्मरणपत्र दिले आहे.
झेडपीच्या 142 शाळा मुख्याध्यापकांविना
सोलापूर जिल्हा परिषदेच्या साडेतीन हजारांहून अधिक शाळा आहेत. खासगी शाळांच्या तुलनेत झेडपी शाळांची पटसंख्या कमी होऊ लागली असून त्याठिकाणी दर्जा सुधारण्याची गरज आहे. मात्र, या शाळांमध्ये 596 शिक्षकांची पदे रिक्त असून त्यात विज्ञान, गणित, इंग्रजी या विषयांच्या शिक्षकांची सर्वाधिक संख्या आहे. दुसरीकडे 142 शाळांना मुख्याध्यापकच नाहीत, अशी विदारक स्थिती आहे. तरीही रिक्तपदांची भरती होत नसल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या घरकुल योजनांची अंमलबजावणीसह ग्रामीण विकासासंबंधीच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागास संचालक नाही. तर कुर्डूवाडी, मंगळवेढा, सांगोला, मोहोळ व बार्शी या पंचायत समित्यांमध्ये सहायक गटविकास अधिकारीच नाहीत. बालविकास प्रकल्प अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शालेय पोषण आहार अधीक्षक, उपशिक्षणाधिकारी, पशुधन विकास अधिकारी, सहायक जिल्हा आरोग्याधिकारी, वैद्यकीय अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभागाचा उपअभियंता, बांधकाम विभागात नऊ उपअभियंते, नऊ जलसंधारण अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे कोरोनाचे सावट अद्याप संपलेले नसतानाही जिल्ह्याला साथरोग वैद्यकीय अधिकारी मिळू शकला नाही. अधिकाऱ्यांच्या तथा शासकीय वाहनांना 21 वाहनचालक नाहीत. आरोग्यसेवक, आरोग्यसेविकांची 156 पदे रिक्त झाली आहेत. पाच औषण निर्माण अधिकारी, 21 आरोग्य पर्यवेक्षकांची पदेही रिक्त आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील पदभरतीस वित्त विभागाने मान्यता देऊनही सोलापूर जिल्हा परिषदेतील याच विभागातील तब्बल पाचशे पदे रिक्त असूनही भरती प्रक्रिया सुरु झालेली नाही, हे विशेष.
झेडपीतील रिक्तपदांचा घोषवारा...
प्राथमिक शिक्षक : 596
मुख्याध्यापक : 142
आरोग्य कर्मचारी : 405
पशुधन विकास अधिकारी : 41
बांधकामसह अन्य विभाग : 189
एकूण : 1,250
रिक्तपदे भरण्याची आहे गरज
जिल्हा परिषदेतील महत्त्वाच्या विभागांमधील पदे रिक्त झाली आहेत. मागील काही वर्षांत वर्ग एक व वर्ग दोनची पदे भरली गेली नाहीत. त्यामुळे शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसह प्रशासकीय कामकाज करणे सोयीचे व्हावे म्हणून ही पदे तत्काळ भरावीत, असे पत्र शासनाला पाठविले आहे.
- दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सोलापूर जिल्हा परिषद