"भोगावती कोपली, आमच्या कुटुंबातील सदस्यांना घेऊन गेली!' शेतकऱ्याचा टाहो; नदीपात्रात बुडून दोन म्हशींचा मृत्यू 

शांतिलाल काशीद 
Saturday, 19 September 2020

शुक्रवारी मध्यरात्री अचानक झालेल्या मुसळधार पावसाने भोगावती नदीला पुराचे स्वरूप प्राप्त झाले. त्यामध्ये बुडून एक दुभती म्हैस, एक दुभती गाभण म्हैस अशा दोन म्हशींचा मृत्यू झाला. नदीच्या कडेला बांधलेल्या दोन्ही म्हशी सकाळी मृत झाल्याचे दिसताच काटमोरे कुटुंबीयांच्या अश्रूंचा बांध फुटला. 

मळेगाव (सोलापूर) : बार्शी तालुक्‍यातील पिंपरी (सा) येथील अल्पभूधारक शेतकरी अजित नागनाथ काटमोरे यांच्या दोन मुरा जातीच्या म्हशींचा भोगावती नदीच्या पात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. 

शुक्रवारी मध्यरात्री अचानक झालेल्या मुसळधार पावसाने भोगावती नदीला पुराचे स्वरूप प्राप्त झाले. त्यामध्ये बुडून एक दुभती म्हैस, एक दुभती गाभण म्हैस अशा दोन म्हशींचा मृत्यू झाला. नदीच्या कडेला बांधलेल्या दोन्ही म्हशी सकाळी मृत झाल्याचे दिसताच काटमोरे कुटुंबीयांच्या अश्रूंचा बांध फुटला. मध्यरात्री झालेल्या पावसामुळे भोगावती नदीच्या पाण्यात दोन्ही म्हशींच्या नागफडीत व नाकातोंडात पाणी गेल्याने त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. कुटुंबाचा गाडा चालवणाऱ्या, आर्थिक हातभार लावणाऱ्या तसेच मालकांचा आवाज ऐकताच मोठमोठ्याने हंबरडा फोडत प्रतिसाद देणाऱ्या म्हशींचा मृत्यू झाल्याने काटमोरे कुटुंब दुःखाच्या खाईत लोटले आहे. 

आज घराशी एकरूप झालेली मुकी जनावरे दगावल्याचे पाहून शेतकरी अजित काटमोरे दु:खी होऊन म्हणाले, "भोगावती नदी कोपली, आमच्या कुटुंबातील सदस्यांना घेऊन गेली.' पिंपरी (सा) येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव पासले यांनी घटनास्थळी भेट देऊन घडलेल्या परिस्थितीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. घडलेली दुःखद घटना पाहून परिसरातील शेतकऱ्यांकडून दुःख व्यक्त केले जात आहे. 

डॉ. पासले म्हणाले, मृत झालेल्या दोन्ही म्हशी मुरा जातीच्या आहेत. नदीपात्रातील पाणी नाकातोंडात गेल्याने गुदमरून म्हशींचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पिंपरी (सा) येथील शेतकरी अजित काटमोरे यांचे अंदाजे दीड लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two buffaloes in Barshi died due to drowning in Bhogawati river