त्यांच्यामुळे अनेकांचे प्राण वाचले, पण चुलते- पुतणे ठार 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 4 February 2020

सतीश भीमराव देवकते (रा. देवकतेवाडी घेरडी, ता. सांगोला) हे येथील 108 ऍम्ब्युलन्सवर चालक म्हणून कार्यरत होते. ते आणि त्यांचे चुलते पोपट दादा देवकते हे दोघे जण चडचण परिसरात घरातील जनावरांसाठी तुरीचे भुस्कट स्वरूपात चारा विकत घेण्यासाठी सकाळी दुचाकीवरून (एमएच 45-एके 5768) वरून देवकतेवाडी येथे गेले होते.

मंगळवेढा/ भोसे (सोलापूर) : चडचण ते सोड्डी दरम्यान कर्नाटक हद्दीत सोमवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान अज्ञात वाहनाने समोरून धडक दिल्यामुळे दुचाकीवरील दोघांचा अपघातात मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेले दोघे चुलते- पुतणे असून देवकतेवाडी (ता. सांगोला) येथील रहिवासी आहेत. 
सतीश भीमराव देवकते (रा. देवकतेवाडी घेरडी, ता. सांगोला) हे येथील 108 ऍम्ब्युलन्सवर चालक म्हणून कार्यरत होते. ते आणि त्यांचे चुलते पोपट दादा देवकते हे दोघे जण चडचण परिसरात घरातील जनावरांसाठी तुरीचे भुस्कट स्वरूपात चारा विकत घेण्यासाठी सकाळी दुचाकीवरून (एमएच 45-एके 5768) वरून देवकतेवाडी येथे गेले होते. परत येताना त्यांच्या दुचाकीला चडचण येथे कर्नाटक हद्दीत अज्ञात वाहनाने ठोकरले. या अपघातात सतीश भीमराव देवकते यांचा जागेवरच रक्तस्त्राव होऊन तर पोपट दादा देवकते यांचा उपचारासाठी चडचण येथील रुग्णालयात नेल्यानंतर मृत्यू झाला. रात्री उशिरा चडचण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सतीश भीमराव देवकते हा बऱ्याच वर्षांपासून भोसे प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेल्या 108 रुग्णवाहिकेवर चालक म्हणून कार्यरत होते. त्याच्या जागृतीमुळे अनेकांचे प्राण वाचले पण स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी मात्र त्याला कोणाचाही आधार मिळाला नाही. अत्यंत मितभाषी व मनमिळाऊ असलेल्या सतीश देवकते यांचा अपघातात मृत्यू झाल्याने भोसे परिसरातील ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two killed in accident in Sangola taluka