बारलोणी येथे पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या आणखी दोघांना अटक ! मिळाली चार दिवसांची पोलिस कोठडी 

विजयकुमार कन्हेरे 
Thursday, 14 January 2021

सांगोला येथे झालेल्या सोने चोरी प्रकरणातील तीन संशयित आरोपींना पकडण्यासाठी सोलापूर जिल्हा गुन्हे अन्वेषण पथक (ता. 8) रोजी सकाळी 11 च्या सुमारास बारलोणी येथे गेले असता, तेथे कट्ट्यावर बसलेल्या दोघा संशयित आरोपींना पकडले होते. परंतु, या संशयित आरोपींना सोडवण्यासाठी तिथे असलेल्या सुमारे 50 जणांनी पोलिसांवर व पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक केली होती. 

कुर्डुवाडी (सोलापूर) : सोने चोरी प्रकरणातील तीन संशयित आरोपींना पकडण्यासाठी बारलोणी (ता. माढा) येथे गेलेल्या सोलापूर जिल्हा गुन्हे अन्वेषण पथकाच्या गाडीवर सुमारे 50 जणांनी दगडफेक करून पकडलेल्या दोन आरोपींना सोडवून घेतले. या प्रकरणी गुन्हे अन्वेषण पथकाने दोघांना अटक केली असून, न्यायालयाने त्या दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. संतोष विनायक गुंजाळ (वय 30), सुभाष रामा गुंजाळ (वय 55) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. आतापर्यंत या प्रकरणी पोलिसांनी एकूण पाच जणांना अटक केली आहे. 

सांगोला येथे झालेल्या सोने चोरी प्रकरणातील तीन संशयित आरोपींना पकडण्यासाठी सोलापूर जिल्हा गुन्हे अन्वेषण पथक (ता. 8) रोजी सकाळी 11 च्या सुमारास बारलोणी येथे गेले असता, तेथे कट्ट्यावर बसलेल्या दोघा संशयित आरोपींना पकडले होते. परंतु, या संशयित आरोपींना सोडवण्यासाठी तिथे असलेल्या सुमारे 50 जणांनी पोलिसांवर व पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक केली. या दगडफेकीतून दोन्ही संशयित आरोपींना सोडवून घेतले. यामध्ये पोलिस जखमी झाले होते व पोलिस गाडीच्या काचा फुटल्या होत्या. 

त्यानंतर पोलिस अधिकारी व सुमारे 110 पोलिस कर्मचारी कारवाईसाठी बारलोणी गावात गेले; परंतु हल्ला करणारे सर्व 50 जण पळून गेले होते. तपासी अधिकारी चिमणाजी केंद्रे व त्यांच्या पथकाने काही दिवसांपूर्वी तिघांना अटक केली होती. गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र मांजरे व त्यांच्या पथकाने आणखी दोघांना काल (ता. 13) बारलोणी येथे पकडले व कुर्डुवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले. या दोघा संशयित आरोपींना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two more arrested for throwing stones at police in Barloni