अकलूजजवळ अपघातात दोन मोटारसायकल चालक ठार 

शशीकांत कडबाने 
Monday, 7 September 2020

हरी रंगनाथ शिंदे व प्रकाश शिवाजी लाळगे अशी अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीची नावे आहेत. तर लाळगे यांच्या मागे बसलेली दुसरी व्यक्तीही गंभीर जखमी झाली आहे असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

अकलूज (सोलापूर) : दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात दोन्ही मोटारसायकलस्वार जागीच ठार झाले. ही घटना अकलूज-माळीनगर रस्त्यावरील सुलतानबाबा मंदिराजवळ घडली. अकलूज पोलिस ठाण्यात अपघाताची रात्री उशीरा नोंद करण्यात आली आहे. 
याबाबत अकलूज पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अकलूज - माळीनगर रोडवरील सुलतान बाबा मंदिराजवळ रविवार (ता.6) रात्री हरी रंगनाथ शिंदे (वय 30, रा. माळीनगर) हे मोटारसायकल (एमएच 45/एजे1036) वर अकलूजहून माळीनगरकडे येत होते. पंचवटी येथे सुलतान बाबा मंदिरानजिकच्या भंगार दुकानासमोर माळीनगरकडून अकलूजकडे जाणारी दुसरी मोटारसायकल (एमएच 42/एडब्ल्यू 1273) यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातात हरी शिंदे व दुसऱ्या मोटारसायकलवरील चालक प्रकाश शिवाजी लाळगे (वय 29, रा. कचरेवाडी) यांच्या डोक्‍यास गंभीर दुखापत झाली. यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला. प्रकाश लाळगे यांच्या मागे बसलेली दुसरी व्यक्तीही गंभीर जखमी झाली आहे असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पानसरे हे करीत आहेत. 

संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two people killed in accident near Akluj