
कार, मालट्रक व मोटारसायकल अशा तिहेरी अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर अन्य चारजण जखमी झाले आहेत. हा अपघात सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावरील खंडाळी फाट्याजवळ दुपारी 12 वाजता झाला. अंकुश वसंत चव्हाण (वय 55, रा. पापरी, ता. मोहोळ) व वंदना पगारे (वय 52, रा. नाशिक) अशी मृतांची नावे आहेत.
मोहोळ (सोलापूर) : कार, मालट्रक व मोटारसायकल अशा तिहेरी अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर अन्य चारजण जखमी झाले आहेत. हा अपघात सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावरील खंडाळी फाट्याजवळ दुपारी 12 वाजता झाला. अंकुश वसंत चव्हाण (वय 55, रा. पापरी, ता. मोहोळ) व वंदना पगारे (वय 52, रा. नाशिक) अशी मृतांची नावे आहेत. तर प्रणव अतुल चव्हाण (वय 9, रा. पापरी), युवराज पगारे (वय 22), रामदास पगारे (वय 58) व कोयल पगारे (वय 25, सर्व रा. नाशिक) अशी जखमींची नावे आहेत. जखमींवर सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मोडनिंब येथील महामार्ग वाहतूक मदत केंद्राकडून व मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कार (क्र. एमएच 15 जीएक्स 9302) ही सोलापूरहून पुण्याच्या दिशेने भरधाव निघाली होती, तर मालट्रक (क्र. केए 56 - 2163) हा पुण्याहून सोलापूरच्या दिशेने निघाला होता. दरम्यान, अंकुश चव्हाण हे खंडाळी फाट्यावरून मोटारसायकल (क्र. एमएच 13 सीव्ही 2273) वरून पापरीकडे वळताना भरधाव येणाऱ्या कारने त्यांना जोराची धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना सोलापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, कार चालकाने मोटारसायकलला धडक देऊन रॉंग साईडने जाऊन विरुद्ध दिशेने येणाऱ्या मालट्रकला जोराची धडक दिली. त्यात वंदना पगारे या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान अपघाताचे वृत्त समजताच मोडनिंब येथील महामार्ग मदत केंद्राचे पोलिस उपनिरीक्षक सज्जन वाघमोडे, पोलिस उपनिरीक्षक अनिल चौगुले, पोलिस नाईक बोरकर, पोलिस नाईक सुर्वे, पोलिस नाईक चव्हाण, पोलिस नाईक सावंत, पोलिस नाईक कदम व पोलिस नाईक चव्हाण यांनी टोल नाक्यावरील रुग्णवाहिकेला पाचारण करून जखमींना तातडीने सोलापूरला उपचारासाठी दाखल केले. या अपघाताची नोंद मोहोळ पोलिसांत झाली आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक अशोक सायकर करीत आहेत.
दरम्यान, अंकुश वसंत चव्हाण यांचा मृत्यू झाल्याची बातमी पापरी येथे समजताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली. या घटनेबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
संपादन : श्रीनिवास दुध्याल