दुचाकीस्वाराने पळवला रस्त्याने बोलत जाणाऱ्याचा मोबाईल ! पार्किंगमधील रिक्षा घेऊन चोरटा पसार

Solapur Crime
Solapur Crime

सोलापूर : नातेवाइकाचा फोन आल्याने घरासमोरून मोबाईलवर बोलत पायी जाताना मागून आलेल्या दुचाकीस्वारांनी हातातील मोबाईल हिसकावून नेला. दत्तप्रसाद किसनराव कुलकर्णी (रा. विजयपूर रोड) हे रात्री पावणे अकराच्या सुमारास घरासमोरून चालत निघाले होते. मोबाईलची किंमत अंदाजित दहा हजार रुपये असल्याचेही कुलकर्णी यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिस हवालदार श्री. खांडेकर त्या दुचाकीस्वारांचा शोध घेत आहेत. काही दिवसांपूर्वी अशाप्रकारच्या दोन घटना घडल्या आहेत. 

रंगभवनजवळ पार्क केलेली रिक्षा चोरीला 
रंगभवन येथे रिक्षा पार्किंग करून मित्रांसमवेत कामानिमित्त पंढरपूर येथे गेल्यानंतर चोरट्यांनी रिक्षा पळवून नेल्याप्रकरणी चोरट्याविरुद्ध सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विडी घरकुल, कुंभारी येथील फिरोज पठाण यांनी त्याबाबत फिर्याद दिली आहे. आपली रिक्षा (एमएच-13 - 5345) रंगभवन येथील रिक्षा स्टॉपजवळून पळवून नेल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिस नाईक श्री. वाडीकर हे पुढीत तपास करत आहेत. 

शेळगी येथील अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू 
दुचाकीवरून जात असताना मित्र नूर मोहम्मद गुलाब जामदार (रा. कासेगाव, ता. पंढरपूर) यास गंभीर जखमी करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या कंटेनरचालक राम अवतार शिवाजी राम मीना (रा. जहानपूर, भिलवाडा, राजस्थान) याच्याविरोधात नितीन छगन चौधरी (रा. लोकमंगल विहार, बाळे) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार कंटेनर चालकाविरुद्ध जोडभावी पेठ पोलिसांत गुन्हा नोंद दाखल झाला आहे. ही घटना शेळगी ब्रिजच्या उतारावरून जाताना घडल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक श्री. राठोड हे करीत आहेत. 

आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणातील संशयित आरोपी निर्दोष 
होटगी (ता. दक्षिण सोलापूर) येथील इमामबी खलील पीरजादे या विवाहितेला शिवीगाळ व मारहाण करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणातील संशयित आरोपी जाकीर सत्त्तार पीरजादे (रा. पीरजादे वस्ती, होटगी) याची अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. डी. खेडेकर यांनी निर्दोष मुक्‍तता केली. संशयित आरोपीचे वकील जयदीप माने यांचा युक्‍तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरत हा निकाल दिला. त्याच वेळी न्यायालयाने हा गुन्हा केवळ आरोपी पती असेल, तरच सिद्ध होऊ शकतो, असा महत्त्वपूर्ण निर्वाळाही दिला. 

मयत इमामबी हिच्या पतीला जन्मठेपेची शिक्षा झाल्याने तो कारागृहात होता. तो कारागृहातून सुटल्यानंतर जाकीरने इमामबीला मदत करणे बंद केले. त्यामुळे त्यांच्यात भांडण सुरू झाले. जाकीर हा आपल्याला शिवीगाळ व मारहाण करून त्रास देत होता आणि त्यामुळे आपण पेटवून घेतल्याचा मृत्यूपूर्व जबाब तिने दिला. तपास पूर्ण झाल्यानंतर वळसंग पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र पाठवले. 

सुनावणीवेळी ऍड. माने यांनी इमामबीचा मृत्यू हा अपघाती असून भाजल्यानंतर दवाखान्यात दाखल होताना तिने वैद्यकीय अधिकाऱ्यास स्टोव्हच्या भडक्‍याने भाजल्याचे सांगितले. जाकीरने मृत इमामबीची जमीन कसण्यासाठी घेतली होती. त्या वादातून जाकीरला या गुन्ह्यात खोटेपणाने गुंतविल्याचेही सांगितले. या खटल्यात संशयित आरोपीतर्फे ऍड. मनोज गिरी, ऍड. विकास मोटे यांनी काम पाहिले; तर सरकारतर्फे ऍड. प्रकाश जन्नू यांनी काम पाहिले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com