"उजनी' पूर्ण क्षमतेने भरल्याने बॅकवॉटर क्षेत्र सुखावले; मात्र पाणीवाटपाचे हवे योग्य नियोजन 

राजाराम माने 
Wednesday, 16 September 2020

पुणे जिल्हा परिसर, भीमा खोरे तसेच घाटमाथ्यावर झालेल्या दमदार पावसाच्या बळावरच नेहमीप्रमाणे याही वर्षी उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. सध्या धरणाची टक्केवारी 111 टक्के एवढी झाली आहे. उजनी धरण 100 टक्के भरले असले तरी, भरलेल्या पाणीवाटपाचे जलसंपदा विभागाकडून नियोजित धोरण झाले नाही तर ते रिकामे होण्यास वेळ लागत नाही. 

केत्तूर (सोलापूर) : सोलापूर, पुणे व अहमदनगर जिल्ह्याला वरदान ठरलेले उजनी धरण 31 ऑगस्ट रोजी पूर्ण क्षमतेने (100 टक्के) भरले असून, आजअखेर उजनीतून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग (30 हजार क्‍युसेकने) सुरू केल्याने उजनी बॅकवॉटर क्षेत्रातील शेतकरी सुखावला आहे. 

पुणे जिल्हा परिसर, भीमा खोरे तसेच घाटमाथ्यावर झालेल्या दमदार पावसाच्या बळावरच नेहमीप्रमाणे याही वर्षी उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. सध्या धरणाची टक्केवारी 111 टक्के एवढी झाली आहे. उजनी धरण 100 टक्के भरले असले तरी, भरलेल्या पाणीवाटपाचे जलसंपदा विभागाकडून नियोजित धोरण झाले नाही तर ते रिकामे होण्यास वेळ लागत नाही, हे दोन वर्षांपूर्वी (2018) उजनी धरण 100 टक्के भरूनही पाणीसाठा उजनी धरणाच्या इतिहासात प्रथमच नीचांकी मायनस (वजा) 59 टक्केपर्यंत गेला होता त्या वेळी दिसून आले होते. त्या वेळी उभी पिके जगविण्यासाठी करमाळा, इंदापूर, दौंड, कर्जत या तालुक्‍यांच्या बॅकवॉटर परिसरातील शेतकऱ्यांना 3 ते 4 किलोमीटरपर्यंत जलाशयामध्ये चाऱ्या खणून पिके जगवण्यासाठी पाणी अक्षरश: पळवावे लागले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. याचा विचार आत्ताच होणे गरजेचे आहे. 

उजनी धरण हे राज्यातील जायकवाडी व कोयना धरणानंतर सर्वांत मोठे धरण आहे. या धरणाच्या उपयुक्त पाणीसाठ्यापेक्षा (53.57 टीएमसी) मृतसाठा 63.65 टीएमसी एवढा मोठा असल्याने उजनी हे राज्यातील मृतसाठ्याच्या बाबतीतही सर्वाधिक मृतसाठा असणारे राज्यातील एकमेव धरण आहे. सोलापूरसह चार जिल्ह्यांतील अर्थकारण व राजकारण अवलंबून असणाऱ्या उजनीचा अस्थिर झालेला काटा पुन्हा एकदा उजनी भरल्याने स्थिर झाला आहे. याबरोबरच उजनी धरणाच्या पाणी साठ्यावर प्रतिदिन हजारो कुटुंब मच्छीमारी करून उदरनिर्वाह करतात. वर्षभर चालणाऱ्या या व्यवसायाला पाणी मुबलक झाल्याने कसलीही अडचण येणार नाही. तरीही जलसंपदा खात्याने जलाशयामध्ये मत्स्यबीज सोडणे गरजेचे आहे. 

जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतील बहुतांश गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना तसेच औद्योगिक वसाहतींना (एमआयडीसी) या धरणातून पाणीपुरवठा होतो. उजनीच्या पाणी साठ्याला यशवंतसागरही म्हटले जाते. उजनी धरणाची एकूण क्षमता 117 टीएमसी असून धरणात साधारणतः 113 टक्‍क्‍यांपर्यत पाणीसाठा केला जातो. आता धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने डिकसळ पुलावर पर्यटकांची वर्दळ मात्र हळूहळू वाढू लागली आहे. 

सद्य:स्थिती : उजनीत येणारा विसर्ग 

 • दौंड : 6881 क्‍युसेक 
 • बंडगार्डन : 5437 क्‍युसेक 

उजनीतून जाणारा विसर्ग

 • कालवा : 2400 
 • बोगदा : 1000 
 • वीजनिर्मिती : 1600 
 • भीमा नदी : 3000 
 • एकूण पाणीपातळी : 497.269 मी. 
 • एकूण पाणीसाठा : 3486.71 दलघमी (59.49 टीएमसी) 
 • उपयुक्त पाणीसाठा : 1684.90 दलघमी (54.45 टीएमसी) 
 • एकूण टक्केवारी 111.05 
 • संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Ujani dam filled to its full capacity so backwater area farmers are happy