उजनी पाईपलाईनला बाळे परिसरात गळती ! शहराला शनिवार, रविवारी कमी दाबाने पाणी

तात्या लांडगे
Friday, 20 November 2020

ठळक बाबी... 

 • बाळे पुलाजवळील सावजी हॉटेल परिसरात व बाळे पोलिस चौकीजवळ उजनी पाईपलाईनला गळती
 • पाईपलाईन गळती दुरुस्तीसाठी लागणार 15 ते 18 तासांचा वेळ
 • उजनी पंप बंद ठेवावा लागणार असल्याने शहर- हद्दवाढ भागाला मिळणार कमी दाबाने पाणी
 • शहर व हद्दवाढ भागाला एक रोटेशन चार दिवसाआड पाणी मिळेल
 • नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरण्याचे सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागाकडून आवाहन
 • हद्दवाढ भागातील बहूतेक नगराला पाच ते सहा दिवसाआड मिळते पाणी; महापालिकेकडे, मात्र चार दिवसाआड नोंद

सोलापूर : सोलापूर ते उजनी पाईपलाईन जुनी झाली असल्याने वारंवार गळती होऊ लागली आहे. तर दुसरीकडे सतत वीजपुरवठा खंडीत होत असल्याचा परिणाम शहराच्या पाणी पुरवठ्यावर झाला आहे. वर्षभराची पाणीपट्टी भरुनही नागरिकांना 100 दिवसदेखील पाणी मिळत नाही. आता बाळे परिसरात दोन ठिकाणी पाईपलाईनला गळती लागल्याने पाणी मोठ्या प्रमाणावर वाया जात आहे. गळती दुरुस्तीचे काम 18 तासांपर्यंत चालणार असल्याने 21 व 22 नोव्हेंबरला कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

ढिसाळ नियोजनाचा नागरिकांना मनस्ताप
धरण उशाला आणि कोरड घशाला, अशी परिस्थिती शहरवासियांची झाली आहे. उजनी, औज, हिप्परगा हे स्त्रोत 100 टक्‍के भरले आहेत. तरीही वारंवार वीजपुरवठा खंडीत होतो तर कधी पाईपलाईन फुटते. यावर अद्याप कायमचा तोडगा निघू शकलेला नाही. विस्कळीत पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांना मनस्ताप सोसावा लागत आहे. ठोस नियोजन केल्यास शहराला दोन दिवसाआड पाणी मिळू शकेल. मात्र, अधिकाऱ्यांकडून नियोजन होत नसल्याची खंत आहे. 
- देवेंद्र कोठे, नगरसेवक

पाईपलाईन गळती दुरुस्तीसाठी वेळ लागणार असल्याने उजनीवरील पंप 19 तासांपर्यंत बंद ठेवला जाणार आहे. त्यामुळे शहराला औज बंधाऱ्यातून पाणी पुरवठा केला जाणार आहे. मात्र, हा पाणी पुरवठा कमी दाबाने असणार आहे. शहरातील मध्यवर्ती भागातील काही नगरांना तीन- चार दिवसाआड पाणी मिळते. तर हद्दवाढ भागातील नागरिकांना पाच ते सहा दिवसाआड पाणी मिळत आहे. धक्‍कादायक बाब म्हणजे महापालिकेच्या दप्तरी त्या नगरांनाही चार दिवसाआडच पाणी पुरवठा केला जात असल्याची नोंद आहे. याबाबत संबंधित विभागाचे अधिकारी महावितरणला दोष देऊ लागले आहेत.

ठळक बाबी... 

 • बाळे पुलाजवळील सावजी हॉटेल परिसरात व बाळे पोलिस चौकीजवळ उजनी पाईपलाईनला गळती
 • पाईपलाईन गळती दुरुस्तीसाठी लागणार 15 ते 18 तासांचा वेळ
 • उजनी पंप बंद ठेवावा लागणार असल्याने शहर- हद्दवाढ भागाला मिळणार कमी दाबाने पाणी
 • शहर व हद्दवाढ भागाला एक रोटेशन चार दिवसाआड पाणी मिळेल
 • नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरण्याचे सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागाकडून आवाहन
 • हद्दवाढ भागातील बहूतेक नगराला पाच ते सहा दिवसाआड मिळते पाणी; महापालिकेकडे, मात्र चार दिवसाआड नोंद

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ujani pipeline leaks in Bale area ! Low pressure water to the solapur city on Saturday, Sunday