'एफआरपी' दिल्याशिवाय चिमणीवरून खाली उतरणार नाही! "गोकूळ'च्या विरोधात "युगंधर'चे अनोखे आंदोलन 

राजशेखर चौधरी
Monday, 14 September 2020

वेळोवेळी मागण्या करूनही मान्य न झाल्यामुळे आज (सोमवारी) युगंधर संघटनेच्या वतीने गोकूळ शुगर कारखान्याच्या चिमणीवर चढून युगंधर संघटनेने अनोखे आंदोलन केले. दुपारी दोनपर्यंत आंदोलक चिमणीवर चढून आंदोलन सुरूच ठेवले होते. आमच्या खात्यावर उसाची रक्कम जमा केल्याशिवाय आम्ही चिमणीवरून उतरणार नाही, असे आंदोलकांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

अक्कलकोट (सोलापूर) : गोकूळ शुगरने (धोत्री, ता. दक्षिण सोलापूर) मागील हंगामात पुरवलेल्या उसाचे बिल अद्यापपर्यंत अदा न केल्याने आज (सोमवारी) सकाळी युगंधर संघटनेच्या वतीने कारखान्याच्या चिमणीवर चढून आंदोलन करण्यात आले. दोन चिमण्यांवर प्रत्येकी पाच जण चढून तर बाकीचे इतर पद्धतीने आंदोलनात सहभाग नोंदवला. आंदोलकांनी पहाटे तीनपासून आंदोलनात भाग घेतला. आंदोलकांना चिमणीवर चढण्यासाठी दोन तास लागले. 

गेल्या सात महिन्यांपासून कारखान्याने एक दमडीदेखील अदा केली नाही. आमच्या खात्यावर उसाची रक्कम जमा केल्याशिवाय आम्ही खाली उतरणार नाही, असे आंदोलक सोमनाथ देवकते यांनी स्पष्ट केले. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, शेतकरी वर्ग सध्या कोरोनाच्या साथीत लॉकडाउनमुळे विविध समस्यांचा सामना करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. त्यातच गोकूळ शुगर, धोत्री या कारखान्याने शेतकऱ्यांचे उसाची बिले अद्यापपर्यंत दिलेली नाहीत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा जादा भाव तर सोडाच पण शेतकऱ्यांना किमान भाव देखील दिला नाही, त्यामुळे आमच्या मागण्यांचा लवकरात लवकर विचार व्हावा, असे निवेदन साखर संचालकांना देण्यात आले होते. त्यात ऊस नियंत्रकांच्या आदेशानुसार 14 दिवसांत एफआरपीनुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर बिले जमा करणे बंधनकारक असताना देखील गोकूळ शुगरने गेल्या हंगामाची रक्कम दिली नाही. ती त्वरित ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, शेतकऱ्यांची बिले नियमाप्रमाणे कलम 33 ए नुसार अदा केली नसल्यास विलंब 
म्हणून 15 टक्के व्याजासह शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करावी. गेल्या हंगामाची रक्कम वरील दोन मागण्यांनुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर 13 सप्टेंबरपर्यंत अदा करावी; अन्यथा कारखान्याचा चालू हंगामाचा गाळप परवाना रद्द करावा किंवा परवाना देऊ नये आदी मागण्या करण्यात आल्या होत्या. 

आमच्या मागण्यांचा विचार नाही झाल्यास संघटनेच्या वतीने साखर कारखानास्थळावर सोमवारी (ता. 14) अगळ्यावेगळ्या पद्धतीने अनोखे व तीव्र स्वरूपाचे 
आंदोलन करण्यात येईल, याची नोंद घ्यावी व होणाऱ्या परिणामास प्रशासन व संबंधित कारखाना जबाबदार राहील, असे निवेदनाद्वारे कळविले होते. त्यावर विशाल गुंड-पाटील, अनिल पाटील, सोमनाथ देवकते, गणेश मोरे, प्रमोद आठवले, अभिजित नेटके, जयप्रकाश मोरे व देविदास हांडे यांच्या स्वाक्षऱ्या होत्या. हे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलिस अधीक्षक मनोज पाटील, दक्षिण सोलापूरचे तहसीलदार अमोल कुंभार, आमदार प्रणिती शिंदे यांना पाठवून दिले होते. 

तरीही मागण्या मान्य न झाल्यामुळे आज (सोमवारी) युगंधर संघटनेच्या वतीने कारखान्याच्या चिमणीवर चढून अनोखे आंदोलन करण्यात आले. दुपारी दोनपर्यंत आंदोलक चिमणीवर चढून आंदोलन सुरूच ठेवले होते. आमच्या खात्यावर उसाची रक्कम जमा केल्याशिवाय आम्ही चिमणीवरून खाली उतरणार नाही, असे आंदोलकांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. आंदोलनस्थळावर पोलिस देखील दाखल झाले आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unique agitation of farmers for sugarcane bill on Gokul Sugar