विद्यापीठांच्या परीक्षा 31 मार्चपर्यंत थांबविल्या 

तात्या लांडगे
सोमवार, 16 मार्च 2020

  • आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे आदेश 
  • 1 एप्रिलपासून परीक्षांचे विद्यापीठांकडून नियोजन 
  • विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी घेतला तातडीचा निर्णय 
  • विद्यार्थ्यांना महाविद्यालयांच्या माध्यमातून पोहचविला निरोप 

सोलापूर : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली असून अनेक शहरांमध्ये जमाव बंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. शाळा, महाविद्यालयांना सुट्ट्या देण्यात आल्या असून वस्तीगृहे व ग्रंथालयांना टाळे ठोकण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर आता परीक्षाही 31 मार्चपर्यंत घेवू नयेत, असे आदेश सोमवारी (ता. 16) आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी विद्यापीठांना दिले. 

 

राज्यातील साडेपाच हजार महाविद्यालयांमधील सुमारे 27 लाखांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसणार होते. मात्र, यवतमाळ, नगर, औरंगाबाद, नागपूर, पुणे, मुंबईसह अन्य शहरांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण होते. दरम्यान, महाविद्यालयांनी परीक्षार्थी विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी, असे आदेशही विद्यापीठांनी दिले होते. मात्र, महाविद्यालयांनी विद्यापीठाकडेच बोट दाखविले होते. त्यामुळेही विद्यार्थ्यांची चिंता वाढली होती. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विषय गंभीर बनल्याने लोकप्रतिनिधींनीही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेत आरोग्य मंत्र्यांनी नुकताच निर्णय जाहीर केला. उद्यापासून (मंगळवारी) सुरु होणाऱ्या परीक्षा तत्काळ स्थगित कराव्यात, असे आदेश ई-मेलद्वारे आरोग्य मंत्र्यांनी सर्व विद्यापीठांना पाठविले. त्यामुळे विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना तशा सूचना महाविद्यालयांच्या माध्यमातून दिल्या आहेत. 

 

1 एप्रिलपासून परीक्षेचे नवे नियोजन 
पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासह बहूतांश विद्यापीठांच्या परीक्षा उद्यापासून (ता. 17) सुरु होणार होत्या. त्यानुसार विद्यापीठ प्रशासनाने सर्व नियोजनही केले होते. मात्र, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे आदेश नुकताच प्राप्त झाल्याने आता परीक्षा 31 मार्चपर्यंत स्थगित केल्या आहेत. 1 एप्रिलपासून पुन्हा परीक्षा घेण्याचे नियोजन आहे. 
- श्रेणिक शहा, परीक्षा नियंत्रक, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: University exams were stopped till March 31