अधिकाऱ्यांच्या गावात सत्ता परिवर्तन ! "महाविकास'कडून राष्ट्रवादी चारीमुंड्या चित; ऐतिहासिक विजय 

Upalai.
Upalai.

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : संपूर्ण तालुक्‍याचे लक्ष लागलेल्या उपळाई बुद्रूक ग्रामपंचायतीवर दीपक देशमुख ग्रामविकास आघाडीने (महाविकास आघाडी) प्रगतशील बागायतदार शरद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सत्ताधारी आमदार बबनराव शिंदे प्रणीत नंदिकेश्वर ग्रामविकास आघाडीच्या (राष्ट्रवादी) गायकवाड व नागटिळक गटाचा पराभव करत ग्रामपंचायतीवर 15 पैकी 14 जागांवर विजय मिळवत ग्रामपंचायतीवर एकहाती निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. 

ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाल्यानंतर उपळाई बुद्रूक हे गाव बिनविरोध करण्यासाठी विविध बैठका व चर्चा झाल्या. परंतु बिनविरोधची चर्चा मावळल्यानंतर गावातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते. त्यामुळे ही ग्रामपंचायत निवडणूक अनेकांच्या प्रतिष्ठेची झाली होती. त्यात गेल्या वेळेस त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यानंतर दीपक देशमुख व सीताराम गायकवाड गटाने हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली होती. परंतु मध्यंतरीच्या काळात राजकीय कुरघोडी करत गायकवाड गटाने ऐनवेळी दादासाहेब नागटिळक यांना पाठिंबा देत दीपक देशमुख यांच्या गटाला मोठा धक्का दिला होता. या मोठ्या राजकीय नाट्यमय घडामोडीनंतर उपळाई गावातील राजकीय वातावरण बदलले होते. त्यामुळे दीपक देशमुख यांनी यंदाच्या निवडणुकीत 15-0 करण्यासाठी दंड थोपटले होते. गेल्या वेळेस दीपक देशमुख यांच्या विरोधात सीताराम गायकवाड गट व त्यांच्या समवेत अजितसिंह देशमुख, मल्लिकार्जुन झाडबुके, लक्ष्मण जाधव, बेडगे गट, वाकडे गट व तिसरी आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादीचेच दादासाहेब नागटिळक गट निवडणूक लढवत होते. 

गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या पावलावर पाऊल ठेवत उपळाई बुद्रूक ग्रामपंचायतमध्येही महाविकास आघाडीचा पॅटर्न राबविण्याचा निर्णय प्रगतशील बागायतदार शरद पाटील यांनी घेतला. त्यानुसार त्यांनी गावातील राष्ट्रवादीचे झाडबुके गट, वाकडे गट, बेडगे गट, अजितसिंह देशमुख, लक्ष्मण जाधव यांना दीपक देशमुख ग्रामविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रित करत सत्ताधारी गायकवाड व नागटिळक गटाला मोठा धक्का दिला होता. कॉंग्रेसचे दीपक देशमुख व राष्ट्रवादीचे झाडबुके, बेडगे गट, वाकडे गट व शिवसेनेचे नामदेव बाबर यांनी एकत्रित येत ही निवडणूक राष्ट्रवादीच्या गायकवाड व नागटिळक गटाविरुद्ध लढवली. यात सीताराम गायकवाड यांचा वर्षानुवर्षे असलेला बालेकिल्ला समजला जाणाऱ्या प्रभाग क्रमांक एकमध्ये बेडगे गटाच्या माध्यमातून सुरुंग लावला असून, तिन्हीही जगांवर दीपक देशमुख गटाचे वर्चस्व निर्माण झाले आहे. येथे विद्यमान पंचायत समिती सदस्य दगडू शिंदे यांच्या पत्नी सुजाता शिंदे यांचा रोहिणी प्रमोद शिंदे यांनी मोठ्या मताधिक्‍याने पराभव केला. येथेच आजतागायत एकत्र असलेले गायकवाड व बेडगे यांच्यात ही लढत झाली. यामध्ये बेडगे यांनी गायकवाड यांचा पराभव केला आहे.

प्रभाग क्रमांक दोनमध्ये दीपक देशमुख यांच्याविरोधात नागटिळक गट असा सामना झाला. यामध्ये दीपक देशमुख यांनी दोन जागांवर वर्चस्व मिळवले आहे. येथे नागटिळक यांना एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. दीपक देशमुख यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक तीनमध्ये सुरुंग लावण्यासाठी दीपक देशमुख गटाच्या माजी सरपंच सविता दत्तात्रय लवटे यांना पराभूत करण्यासाठी सर्व तऱ्हेचे प्रयत्न केले गेले. परंतु शरद पाटील, दीपक देशमुख व गावातीलच एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या प्रयत्नामुळे विरोधकांचे सर्व प्रयत्न फोल ठरले आहेत. या तिन्ही जागांवर दीपक देशमुख यांनी वर्चस्व मिळवत पुन्हा एकदा बालेकिल्ला म्हणून सिद्ध केले आहे. प्रभाग क्रमांक चारमध्ये दीपक देशमुख गटाविरुद्ध गायकवाड गट अशी लढत झाली. यात पंचायत समितीचे सभापती विक्रमसिंह शिंदे यांचे मेव्हणे अभिषेक देशमुख विरुद्ध राष्ट्रवादी पदवीधर संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप गोरे अशी प्रामुख्याने अटीतटीची लढत वाटत असताना अभिषेक देशमुख यांनी मोठ्या फरकाने संदीप गोरे यांचा पराभव केला आहे. 

प्रभाग क्रमांक पाचमध्ये दीपक देशमुख गटाच्या वतीने राष्ट्रवादीचे मल्लिकार्जुन झाडबुके, लक्ष्मण जाधव व सुमन दिगंबर माळी हे अपक्ष उमेदवार यांच्याविरोधात लढत होते. या प्रभागात झाडबुके गटाची प्रतिष्ठा पणाला लागली होती. लक्ष्मण जाधव विरुद्ध शिवदत्त भोसले ही अटीतटीची लढत वाटत असताना झाडबुके यांच्या अथक प्रयत्नामुळे व नकाते, माळी, डुचाळ गटाच्या सहकार्याने लक्ष्मण जाधव यांनी शिवदत्त भोसले यांचा पराभव केला आहे. एकंदरीत कॉंग्रेसच्या दीपक देशमुख यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे झाडबुके गट, बेडगे गट, वाकडे गट या सर्वांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या गायकवाड-नागटिळक गटाचा 14-1 असा ऐतिहासिक पराभव केला आहे. 

विकास आघाडीसाठी हे ठरले किंग मेकर 
गावातील सर्व गट-तट एकत्र करण्यासाठी प्रगतशील बागायतदार शरद पाटील यांनी मुख्य भूमिका बजावली आहे. त्यांना माजी सरपंच आजिनाथ बेडगे, युवा उद्योजक अभिमन्यू बेडगे, शाहू वाकडे, बिरू वाकडे, युवा उद्योजक सचिन झाडबुके, प्रा नितीन झाडबुके, संतोष नकाते, नामदेव बाबर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 

नूतन ग्रामपंचायत सदस्य... 
रामचंद्र शशिकांत देशमुख, सविता दत्तात्रय लवटे, निर्माला वसंत पाटील, रोहिणी प्रमोद शिंदे, मंगल बाळू माळी, भाग्यश्री धनंजय बेडगे, छाया भगवान आवारे, नागनाथ मारुती गुंड, संतोष सनदकुमार नकाते, अभिषेक अजितसिंह देशमुख, अंजली बसवेश्वर आखाडे, मल्लिकार्जुन शिवशंकर झाडबुके, लक्ष्मण चांगदेव जाधव, सुमन दिगंबर माळी, मनीषा भारत वाकडे 

ठळक घडामोडी 

  • रामचंद्र (अण्णासाहेब) देशमुख सलग दुसऱ्या वर्षी मताधिक्‍याने विजयी 
  • झाडबुके गटामुळे दीपक देशमुख यांची प्रत्येक प्रभागात वाढली ताकद 
  • गायकवाड गट प्रथमच निवडणुकीत सर्वच जागांवर पराभूत 
  • गावातील विविध आडनावांचे गट-तट एकत्र 
  • शरद पाटील यांची महाविकास आघाडीची संकल्पना झाली यशस्वी 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com