अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी अवघ्या पाऊण तासात केला मुंगी घाट सर !

सुनील राऊत 
Monday, 28 December 2020

अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले, की आमच्या गावापासून म्हणजे सासवड पंचक्रोशीतून दरवर्षी हजारो भाविकांसह भुतोजी बुवा तेली म्हणजेच शिखर शिंगणापूरची मानाची तेल्या भुत्याची कावड येत असते. या कावडीसोबत सासवड पंचक्रोशीतील हजारो नागरिक, तरुण व महिलाही मोठ्या प्रमाणात असतात. लहानपणापासून मला मुंगी घाटाचे आकर्षण आहे.

नातेपुते (सोलापूर) : सोलापूर जिल्ह्याचे अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी अत्यंत खडतर असणारा शिखर शिंगणापूर येथील मुंगी घाट हत्तीची सोंड या पारंपरिक मार्गाने अवघ्या पाऊण तासात सर केला. सर्वसामान्य माणसाला हा मार्ग सर करण्यासाठी अडीच ते तीन तास लागतात. या वेळी त्यांच्यासोबत सोबत नातेपुतेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर, व्यसनमुक्त युवक संघाचे सचिव विवेक राऊत, कृषितज्ज्ञ गणेश शिवरकर, विशाल रूपनवर, नातेपुते पोलिस ठाण्याचे कर्मचारी अमित भगत, अमित जाधव, धनाजी मुटकुळे, सचिन कांबळे, शाहू काळदाते होते. 

अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले, की आमच्या गावापासून म्हणजे सासवड पंचक्रोशीतून दरवर्षी हजारो भाविकांसह भुतोजी बुवा तेली म्हणजेच शिखर शिंगणापूरची मानाची तेल्या भुत्याची कावड येत असते. या कावडीसोबत सासवड पंचक्रोशीतील हजारो नागरिक, तरुण व महिलाही मोठ्या प्रमाणात असतात. लहानपणापासून मला मुंगी घाटाचे आकर्षण आहे. मी शालेय जीवनात अनेक वेळा मुंगी घाटातून तेल्या भुत्याच्या कावडीसोबत शिखर शिंगणापूरला गेलेलो आहे. ते क्षण अत्यंत थरारक व अविस्मरणीय आहेत. मात्र, सध्या इच्छा असूनही वर्दीच्या व्यापातून वेळ काढता येत नाही. अनेक दिवसांची इच्छा असल्याने आज मुंगी घाट सर करण्याचा निर्णय घेतला. अत्यंत प्रसन्न वाटले. 

शिखर शिंगणापूर येथील मुंगी घाट हा अत्यंत खडतर असून दरवर्षी चैत्र महिन्यात या मार्गावरून हजारो भाविक कावड घेऊन जात असतात. अत्यंत रोमहर्षक असणारा हा सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्रासह परराज्यातून भाविक व अभ्यासक येथे येत असतात. या मार्गावरून सुमारे 100 कावडी जात असतात. मात्र, सर्वात मोठी व मानाची असणारी श्री संत भुतोजी बुवा तेली यांची कावड मुंगी घाटातून चढविण्याचा सोहळा अत्यंत रोमहर्षक असतो. सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने दरवर्षी कडेकोट बंदोबस्त व आरोग्य यंत्रणा तैनात असते. 

ठळक... 

  • शिखर शिंगणापूरचे या पौराणिक मंदिराची मालकी आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांकडे आहे. 
  • शिखर शिंगणापूर येथे दहिवडीचे स्वागत सहाय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ, पुजारी बडवे, कवडे यांनी केले. 
  • मंदिरातील पुजारी बडवे यांनी संपूर्ण मंदिराचा इतिहास सांगितला व पौराणिक संदर्भ दिले. 
  • अतुल झेंडे यांच्या हस्ते शंभू महादेव मंदिरात अभिषेक व पूजन करण्यात आले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Upper Superintendent of Police Atul Zende crossed Mungi Ghat in just half an hour