अवैध दारू वाहतुकीसाठी फॉर्च्युनरचा वापर; पुणे जिल्ह्यातील दारू सोलापुरात 

संतोष पाटील 
Tuesday, 19 May 2020

पुणे जिल्ह्यातील दारू सोलापुरात 
राज्य सरकारने महसुली तुट भरून काढण्यासाठी दारू दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील दारू दुकाने सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेत उघडण्यास परवानगी दिली. त्यामुळे इंदापूर येथील दारू दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर मद्यप्रेमींना पोलिस बंदोबस्तात दारू विक्री होत आहे. मात्र, सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी लॉकडाउन काळात जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यातील दारू दुकाने बंद ठेवण्याचा आदेश दिले आहेत. इंदापूर येथील अवैध दारू व्यावसायिकांनी या संधीचा फायदा घेण्यासाठी इंदापूरमधून दारू खरेदी करून सोलापूर जिल्ह्यात ती जादा दराने विकून पैसे कमविण्याचा मार्ग निवडला आहे. इंदापूर येथील अनेक जण या व्यवसायामध्ये गुंतले असून टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्याने या विरोधात टेंभुर्णी पोलिसांनी मोहीम उघडली आहे.

टेंभुर्णी (ता. माढा, जि. सोलापूर) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाउनची घोषणा केली असून या काळात कोणत्या वाहनातून कशाची वाहतूक होईल, याचा नेम नाही. पोलिसांची नजर चुकविण्यासाठी लाखो रुपये किमतीची वाहने अवैध व्यवसायासाठी वापरण्यात येत आहेत. लॉकडाउन सुरू असताना अवैधरीत्या विक्री करण्यासाठी देशी-विदेशी दारूचा साठा फॉर्च्युनर जीपमध्ये लपवून सोलापूर जिल्ह्यात घेऊन येत असताना टेंभुर्णी पोलिसांनी छापा टाकून फॉर्च्युनर जीपसह एका व्यक्तीला 20 लाख 46 हजार 250 रुपयांच्या मुद्देमालासह अटक केली. मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावर भीमानगर येथील पुलाच्या खालील रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली 
टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम, हवालदार बिरुदेव पारेकर, देवीदास शिंदे, पोलिस नाईक सोहेल पठाण, पोलिस कॉन्स्टेबल उस्मानबाशा महमदरफिक शेख हे सर्वजण भीमानगर येथील सरदारजी ढाब्यासमोर थांबले होते. त्या वेळी इंदापूर येथून भीमा नदीवरील उड्डाण पुलाखालील रस्त्याने टेंभुर्णीच्या दिशेने एक पांढऱ्या रंगांच्या फॉर्च्युनर जीप (एमएच13-एझेड 4585) मधून देशी-विदेशी दारू अवैधरीत्या घेऊन येणार असल्याची माहिती समजली. सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी तातडीने टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांना ही माहिती कळविली. त्या वेळी पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांनी खात्री करून कारवाई करण्याचा आदेश दिला. त्यामुळे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम व त्यांचे सहकारी पंचासह छापा टाकण्यासाठी सापळा लावून दबा धरून बसले. 
दुपारी साडेबाराच्या सुमारास मिळालेल्या माहितीप्रमाणे फॉर्च्युनर जीप इंदापूरहून सोलापूर जिल्ह्यात आली असल्याचे दिसताच ती पोलिस पथकाने अडविली. त्या वेळी चालकास नाव विचारले असता त्याने कुणाल सिद्धेश्‍वर खडके (वय 21, रा. इंदापूर, जि. पुणे) असे सांगितले. त्या वेळी फॉर्च्युनरची तपासणी केली असता सुमारे 46 हजार 150 रुपये किमतीची विविध प्रकारची देशी-विदेशी दारू व 20 लाख रुपये किमतीची फॉर्च्युनर असा एकूण 20 लाख 46 हजार 150 रुपये किमतीचा माल जप्त केला. जिल्हा पोलिस प्रमुख मनोज पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या आदेशानुसार सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हा छापा टाकला. यामुळे पुणे जिल्ह्यातून अवैधरीत्या देशी-विदेशी दारू सोलापूर जिल्ह्यात आणून विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. हवालदार बिरूदेव पारेकर तपास करीत आहेत. 

दोन तरुणांना अटक 
इंदापूरहून दुचाकीवरून अवैधरीत्या देशी-विदेशी दारू सोलापूर जिल्ह्यात घेऊन येत असताना दोन तरुणांना टेंभुर्णी पोलिसांनी मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास भीमानगर येथील उड्डाण पुलाखालील रस्त्यावर पकडले. संतोष महादेव केव्हारे (वय 32), इरफान चांद शेख (वय 35, रा. दोघेही इंदापूर, जि. पुणे) हे दुचाकीवर (एमएच 42-ए वाय 2343) देशी-विदेशी दारू घेऊन आले असता भीमानगर येथील उड्डाण पुलाखालील रस्त्यावर पकडून त्यांची झडती घेतली असता सुमारे पाच हजार 250 रुपये किमतीची देशी-विदेशी दारू आढळून आली. टेंभुर्णी पोलिसांनी दुचाकीसह 55 हजार 250 रुपये किमतीचा माल जप्त करून दोघांना अटक केली. पोलिस हवालदार देवीदास शिंदे तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Use of Fortuner for illicit alcohol transportation Alcohol in Pune district in Solapur