खासगी रुग्णालयातील रिकाम्या खाटांची माहिती होणार दर दोन तासांनी "अपडेट' 

विजयकुमार सोनवणे
शनिवार, 30 मे 2020

शासकीय रुग्णालय व इतर रुग्णालयाकडून रेफर करण्यात आलेल्या रुग्णांना संबंधित रुग्णालयात त्वरीत दाखल करून घेणे बंधनकारक असणार आहे. ही कार्यवाही आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये तातडीने करण्याचे आदेश आरोग्याधिकारी व संगणक विभागाला देण्यात आले आहेत. 

सोलापूर : शहरातील सुमारे सव्वातीनशे खासगी रुग्णालयातील रिकाम्या खाटांची संख्या दर दोन तासांनी कळणार आहे. त्यासाठी प्रत्येक रुग्णालयाबाहेर डॅशबोर्ड लावण्याचे आदेश महापालिकेचे उपायुक्त डॉ. पंकज जावळे यांनी काढले आहेत. 

काल पालकमंत्री डॉ. दत्तात्रेय भरणे यांच्या उपस्थित झालेल्या पत्रकार परिषदेवेळी हा मुद्दा उपस्थित झाला होता. अनेक रुग्णालये रिकामे असतानाही केवळ कोरोनाची चाचणी केली नाही म्हणून दाखल करून घेण्याचे प्रमाण वाढले होते. याबाबत पालकमंत्र्यांनी नाराजीही व्यक्त केली. दरम्यान याचवेळी, प्रत्येक रुग्णालयातील रिक्त खाटांची संख्या किती असावी याबाबत डॅश बोर्ड लावण्यास सांगावे, अशी सूचना करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले असून, त्याला अनुसरून शहरातील सर्व खासगी रुग्णालयांत अशा प्रकारचे डॅशबोर्ड रुग्णालयाच्या दर्शनी भागातच लावले जाणार आहेत व दर दोन तासांनी रिक्त खाटांची संख्या अपलोड केली जाणार आहे. 

सोलापूर शहरात सध्या 332 खासगी रुग्णालये आहेत. या रुग्णालयातील खाटांची संख्या, दाखल केलेल्या रुग्णांची संख्या तसे दैनंदिन बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या, उपलब्ध खाटांची संख्या अद्ययावत ठेवावी लागणार आहे. ही माहिती उपलब्ध झाल्यावर खासगी रुग्णालयात रिकाम्या असलेल्या खाटांची संख्या त्वरीत समजणार आहे. त्यामुळे कोविड व इतर रुग्णांना संबंधित रुग्णालयात दाखल करणे सोईचे ठरणार आहे. ही माहिती ऑनलाईन पद्धतीने ठेवण्यासाठी महापालिकेतील संगणक विभागाला डॅश बोर्ड तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार नवीन डॅशबोर्ड व गुगल शीट तयार करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. 

सुरवातीला हे डॅशबोर्ड कोविड केअर हॉस्पिटलांमध्ये लावण्यात येणार आहे. त्यानंतर शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. संबंधित रुग्णालयातील रिकाम्या खाटांची संख्या दर दोन तासांनी अपडेट करणे बंधनकारक असणार आहे. शासकीय रुग्णालय व इतर रुग्णालयाकडून रेफर करण्यात आलेल्या रुग्णांना संबंधित रुग्णालयात त्वरीत दाखल करून घेणे बंधनकारक असणार आहे. ही कार्यवाही आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये तातडीने करण्याचे आदेश आरोग्याधिकारी व संगणक विभागाला देण्यात आले आहेत. 

डॅश बोर्डबाबत माहिती देताना उपायुक्त डॉ. पंकज जावळे ()


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vacant beds in private hospitals in Solapur will be updated every two hours.