#valentine day story : " भूगोला'च्या वहीमुळे झाले आयुष्यभराचे "पर्यटन' 

विजयकुमार सोनवणे
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

आज सगळेच म्हणतात.....
लग्नानंतर धुत्तरगांवकर परिवाराची पूर्ण धुरा शुभांगीनेच सांभाळली. सामाजिक कामात रमणार्या गुरुशांतला घरच्या कोणत्याच गोष्टीची कधी काळजीच करावी लागली नाही. शुभांगीने लग्नानंतर डी.एड.चं शिक्षण घेतलं. काही दिवस शिक्षिका म्हणून मानधनावर कामही केलं.

सोलापूर : शुभांगी कट्टे आणि शिवसेनेचे नगरसेवक गुरुशांत धुत्तरगांवकर हे वालचंद कॉलेज मधील पदवीच्या शिक्षणावेळचे क्‍लासमेट. एकदा पर्यटन भूगोलाच्या तासाला गैरहजर असल्यामुळे लिखाण पूर्ण करण्यासाठी गुरुशांत यांनी शुभांगीची वही घेतली. नेमकं पुढील दोन दिवस शुभांगी कॉलेजला येऊ शकली नाही.

म्हणून स्वतःच लिहली वही 
गुरुशांतला वाटलं तिची वही अपूर्ण राहू नये, म्हणून दोन्ही दिवसांचं लिखाण शक्‍य तितक्‍या सुंदर अक्षरांमध्ये शुभांगीच्या वहीत लिहून काढलं. वही परत द्यायच्या दिवशी गुरुशांतने मित्राच्या हातून वही पाठवली. वहीत लिखाण बघून शुभांगी खुश होईल अशी गुरुशांतची अपेक्षा होती. पण दोन-तीन दिवसांनंतर राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराला जाण्याविषयी जेव्हा दोघांचं बोलणं झालं तेव्हा वहीवरुन शुभांगीने गुरुशांतला खडे बोल सुनावले. वही दिल्यावर असं करायचं असतं का ? असा जाब विचारत राग व्यक्त केला. पुढे दोघांचं बोलणंही बंद झालं. त्यावेळी नेमकं काय चुकलं ते गुरुशांतला समजलं नाही. पुढे तिळगुळ देण्याच्या निमित्ताने बोलणं झालं त्यावेळी समजलं की, वहीचा पुठ्ठा कागदांपासून वेगळा होत असल्याने वही चिटकविण्यासाठी गुरुशांतने जे फेव्हिक्वीक वापरलं होतं, ते वहीच्या आत उतरल्याने अनेक कागद एकमेकांना चिटकले होते.

हेही वाचा - संगीता व गोकुळच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर 

जमलेली मैत्री पुढे प्रेमात बदलली
या वादानंतर जमलेली मैत्री पुढे प्रेमात बदलली आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होताच दोघांनी आधी नोंदणी पध्दतीने विवाह केला. मग दहा महिन्यांनी घरच्यांनी पुन्हा लग्न लावून दिलं. विवाह नोंदणी कार्यालयात ऐंशी मित्र उपस्थित असूनही ही गोष्ट दोघांच्या घरी कळू शकली नाही. पूर्वीपासूनच "मैत्री हीच संपत्ती" मानणाऱ्या गुरुशांतला नेहमीच मित्रांची साथ लाभत आली. लग्नानंतर धुत्तरगांवकर परिवाराची पूर्ण धुरा शुभांगीनेच सांभाळली. सामाजिक कामात रमणार्या गुरुशांतला घरच्या कोणत्याच गोष्टीची कधी काळजीच करावी लागली नाही.

इतकी चांगली सून
शुभांगीने लग्नानंतर डी.एड.चं शिक्षण घेतलं. काही दिवस शिक्षिका म्हणून मानधनावर कामही केलं. पुढे पार्लरचा कोर्स करुन ब्युटी पार्लर व जनरल स्टोअर्सचा व्यवसाय त्या सांभाळत आहेत. लग्नापूर्वी आपले नातेवाईक प्रेमविवाह स्वीकारतील का ? अशी भीती गुरुशांत यांच्या मनात होती. मात्र, शांत, कष्टाळू व सुस्वभावी असणाऱ्या शुभांगीने नातेवाईकांची देखील मने जिंकल्याने आज सगळेच म्हणतात, किती शोधली असती तरी इतकी चांगली सून आम्हाला मिळाली नसती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: valentine day story of councilar gurushant and shubhangi of solapur