"थॅंक्‍स अ टीचर'! "पुल्ली कन्या'च्या ऑनलाइन सोहळ्यास 300 विद्यार्थिनी, पालक व शिक्षकांचा सहभाग 

Pulli Kanya Prashala
Pulli Kanya Prashala

सोलापूर : शिक्षक दिनानिमित्त शासनाच्या वतीने "थॅंक्‍स अ टीचर' हे अभियान राबविण्याचे सूचित करण्यात आले होते. प्रत्येकाच्या आयुष्यात असे शिक्षक येतात, की ज्यांच्यामुळे आपल्या जीवनाला नवीन वळण मिळत जाते. ज्या शिक्षकांनी आपल्या आयुष्यात परिवर्तन आणले अशा शिक्षकांचे आभार व्यक्त करणे, आपल्या आवडत्या शिक्षकांबद्दल भावना व्यक्त करण्याची संधी देण्याच्या उद्देशाने सौ. भू. म. पुल्ली कन्या प्रशालेने ऑनलाइन शिक्षकदिन सोहळा हा उपक्रम राबविला. या ऑनलाइन सोहळ्यात 300 विद्यार्थिनी, पालक व सर्व शिक्षकांनी सहभाग घेतला. 

शिक्षक दिनाच्या या ऑनलाइन सोहळ्यासाठी माजी शिक्षक व उपमुख्याध्यापक सदाशिव कन्ना यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. सपना मुळे-पाटील (पुणे) या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. या वेळी डॉ. मुळे-पाटील म्हणाल्या, "शालेय जीवनात शिक्षक मुलांची केवळ गुणवत्ता वाढवतात असे नाही तर आपले विद्यार्थी गुणवंत व्हावेत यासाठी त्यांच्यावर अनेक चांगले संस्कार घडवतात. या संस्कार शिदोरीच्या आधारेच आयुष्याची वाटचाल करताना अनेक अडथळे सहज पार करता येतात.' 
डॉ. मुळे-पाटील यांनी त्यांच्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत म्हणाल्या, शालेय जीवनात मला अनेक चांगले शिक्षक भेटले. त्यांच्याकडून प्रोत्साहन मिळाल्याने डॉक्‍टर होण्याचं माझं स्वप्न मी साकारू शकले. बोर्डाच्या गुणवत्ता यादीत येण्यासाठी कन्ना सरांनी खूप मार्गदर्शन केले; परंतु थोडक्‍यात माझी संधी हुकली. पण ती घटना एका वेगळ्या प्रवासाची सुरवात होती. आपल्या शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थिनींना स्वयंप्रेरित होऊन ध्येय गाठण्यासाठी सातत्याने कष्ट करा, असा संदेश दिला. 

याप्रसंगी 33 वर्षे सेवा बजावलेले माजी शिक्षक श्री. कन्ना यांनी सेवानिवृत्तीनंतर 11 वर्षांनी या कार्यक्रमानिमित्त शिक्षक व विद्यार्थिनींशी संवाद साधत जुन्या आठवणींना उजाळा दिला. शिक्षक व विद्यार्थी यांचं नातं अत्यंत पवित्र असून विद्यार्थी आपले दैवत असतात, त्यांच्यासाठी शिक्षकांनी आधी स्वतःला घडवलं पाहिजे म्हणजे आपण चांगले विद्यार्थी घडवून नव्या समाजाची जडणघडण करू शकतो, असे विचार त्यांनी मांडले. 

मुख्याध्यापिका गीता सादूल यांनी प्रास्ताविकातून, शाळेतल्या मुलींना व पालकांना जीवनात शिक्षकांचे महत्त्व लक्षात यावे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सांगितले. कार्यक्रमाची सुरवात प्रशांत देशपांडे यांच्या "गुरूंनी दिला ज्ञानरूपी वसा' या गीताने झाली. पर्यवेक्षिका कल्पना येमूल यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याची माहिती दिली. सुजाता नकाशे, सानिका देवकर या विद्यार्थिनींनी शिक्षकांबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उपमुख्याध्यापक युवराज मेटे, आशिष मिसाळ यांचे सहकार्य लाभले. ज्योत्स्ना रणदिवे यांनी सूत्रसंचालन केले. हरिप्रसाद बंडी यांनी आभार मानले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com