मुलाने केले गरीब शेतकरी आईवडिलांच्या कष्टाचे चीज ! भाजी विकणारा शरण "यूपीएससी'त देशात आठव्या क्रमांकाने उत्तीर्ण

Sharan Kambale
Sharan Kambale

वैराग (सोलापूर) : मुलाला ऑफिसर बनवण्यासाठी आई-वडिलांनी मजुरीची कामे सोडली नाहीत. मुलांना उच्चशिक्षित केले. पण बारावीपर्यंत गावात आईबरोबर डोक्‍यावर पाटीत भाजी ठेवून विकणाऱ्या मुलाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवले आहे. आणि देशात आठव्या क्रमांकाने तो उतीर्ण होत असिस्टंट कमांडंट या पदावर आपले नाव कोरले आहे. 

शरण गोपीनाथ कांबळे (रा. तडवळे, ता. बार्शी) असे या युवकाचे नाव आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत ऑगस्ट 2019 मध्ये घेण्यात आलेल्या सीएपीएस असिस्टंट कमांडंट (ग्रुप ए) परीक्षेमध्ये देशात आठव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. 

कांबळे कुटुंबीयांना दीड एकर शेती आहे. दोन मुले असणारे कांबळे दांपत्य काबाडकष्ट करते. थोरला मुलगा दादासाहेब इंजिनिअर झाला, तर लहान मुलगा शरण हा अभियंता पदाची पदवी घेऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होता. त्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण यशवंतराव चव्हाण प्रशाला तडवळे, बारावीचे शिक्षण विद्या मंदिर वैराग तर वालचंद कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज सांगली येथे 2016 मध्ये बी टेक झाला. पुढील शिक्षणासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगळूरमधून 2018 मध्ये मास्टर ऑफ टेक्‍नॉलॉजीची पदवी पूर्ण केली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कंपनीने वीस लाखांचे पॅकेज देऊ केले होते, पण शरणने ते पॅकेज नाकारले. कारण, आई सुदामती व वडील गोपीनाथ यांच्या मजुरीचे पांग फेडण्यासाठी त्याने सोळा ते आठरा तास अभ्यासाची मेहनत घेतली. पुढे त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचे ठरविले. ऑगस्ट 2019 मध्ये पहिल्यांदाच परीक्षा दिली आणि तो देशात आठव्या क्रमांकांने उत्तीर्ण झाला. 

सेंट्रल आर्म्ड पोलिस फोर्सद्वारे विविध दलामध्ये भरती केली जाते. शरण हा सीएपीएफ असिस्टंट कमांडंट परीक्षेमध्ये पहिल्याच प्रयत्नात देशात आठवा आला आहे. या परीक्षेमध्ये पास झालेल्या उमेदवारांची बॉर्डर सिक्‍युरिटी फोर्स बीएसएफ, सेंट्रल रिर्झव्ह पोलिस फोर्स सीआरपीएफ, सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्‍युरिटी फोर्स सीआयएसएफ, इंडो -तिबेटियन बॉर्डर पोलिस आयटी-बीपी, सशस्त्र सीमा बल एसएसबी या दलामध्ये निवड केली जाते. 

शरण कांबळेचे आईवडील मोलमजुरी करतात. मुलगा हुशार असल्यामुळे त्यांनी रक्ताचे पाणी करून मुलाला क्‍लासवन बनविले. शरण कांबळे उत्तीर्ण झाल्याचे कळताच गावात फटाक्‍यांची आतषबाजी करण्यात आली. गावातील अनेकांनी शरण कांबळेचे अभिनंदन केले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com