
पोलिसांनी केले 'असे' नियोजन
सोलापूर : ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वरांच्या यात्रेनिमित्ताने 13 जानेवारीला अक्षता सोहळा असणार आहे. त्यानंतर 16 जानेवारीपर्यंत यात्रा चालणार आहे. मात्र, यंदा कोरोनामुळे प्रतिकात्मक यात्रा साजरी केली जाणार आहे. कोरोनाचा ससंर्ग वाढू नये म्हणून अवघ्या 50 मानकऱ्यांनाच परवानगी देण्यात आली आहे. यात्रा काळात शहरात येणाऱ्या नागरिकांवर वॉच ठेवण्यासाठी शहर व ग्रामीण पोलिसांनी संयुक्त नाकाबंदी लावण्याचे नियोजन केले आहे. शहरात येणाऱ्या प्रत्येक रस्त्यांवर वाहनांची तपासणी केली जाणार आहे.
पोलिसांनी केले 'असे' नियोजन
श्री सिध्दरामेश्वर यात्रेनिमित्ताने उद्या (ता. 12) सात नंदीध्वजांची विधीवत पूजा होईल. त्यानंतर यन्नीमज्जन या विधीसाठी 68 लिंगास योगदंडासह तेलमर्दन केले जाणार आहे. 13 जानेवारीला संमती कट्टा येथे अक्षता सोहळा तर 14 जानेवारीला नंदीध्वजास तीळ व हळदीचे उटणे लावून तलावात गंगा स्नान होईल. 15 जानेवारीला नंदीध्वजाची पूजा व 16 जानेवारीला नंदीध्वजाचा साज उतरविण्याचा कार्यक्रम साधेपणानेच होईल. या काळात पास दिलेल्या मानकऱ्यांशिवाय अन्य कोणालाही परवानगी नसेल, असे पोलिस उपायुक्त बापू बांगर यांनी स्पष्ट केले. शहरातील सर्वच रस्त्यांवर पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. त्यांच्यावर पोलिस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांची देखरेख असेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. तत्पूर्वी, शहरात येणाऱ्या सर्वच रस्त्यांवर नाकाबंदी लावली जाणार असून त्यासाठी ग्रामीणचे 150 कर्मचारी असतील, अशी माहिती पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली. 12 ते 16 जानेवारीपर्यंत नाकाबंदी असणार आहे. विनाकारण अथवा वारंवार एकाच कामासाठी शहरात येणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असेही पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
शहरात गर्दी करणाऱ्यांवर राहणार वॉच
ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वर यात्रेनिमित्ताने शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मंदिर परिसरात 144 कलम लागू केल्याने त्याठिकाणी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. शहरातही गर्दी करण्यावर निर्बंध आहेत.
- अंकुश शिंदे, पोलिस आयुक्त