'काय करावं बघा, या वेळी आणलेला माल तसाच पडून हाय !'

Broom Seller
Broom Seller
Updated on

अक्कलकोट (सोलापूर) : दिवाळीत लक्ष्मीपूजनात श्रद्धेने अनेकजण केरसुणीची पूजा करतात आणि स्वच्छतेचे प्रतीक मानून त्याचा सन्मान करतात. पण, ही केरसुणी बाजारात उपलब्ध होण्यासाठी कष्ट करते, त्या लक्ष्मीचे हात मात्र अनेकवेळा रिकामेच असल्याचे स्पष्ट होत आहे. अक्कलकोट येथे बाजारात केरसुणी, सूप तसेच उतली विक्रीसाठी आणणाऱ्या महिलांनी याबाबत "सकाळ' प्रतिनिधीशी बोलताना ही बाब प्रकर्षाने जाणवली. 

धनत्रयोदशीला केरसुणीची खरेदी करून लक्ष्मीपूजनाला रीतसर तिची पूजा केली जाते. मात्र, यंदा केरसुणी बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या भावात मोठी वाढ झाली; विक्रीचा भाव मात्र वाढताना दिसत नाही. त्याचे कष्ट आणि होणारा खर्च तसेच ग्राहकांकडून मिळणारी किंमत याचा मेळ बसेनासा झाला आहे, असे विक्रेते सांगत आहेत. त्यामुळे केरसुणी बनविणारे व विक्री करणारे हात मात्र लक्ष्मीविना राहात आहे. केरसुणी करणारे शेकडो पारंपरिक व्यवसायात आता मजा राहिली नाही, असे म्हणत आहेत. मात्र सहजसुलभ केरसुणी बनविण्याची कला कमी फायद्यात असूनही ती बनविण्याचे काम मात्र सुरूच आहे. 

अक्कलकोट तालुक्‍यातील अनेक कुटुंबं या व्यवसायात आहेत. दिवस-रात्र मेहनत करून एक कुटुंब केरसुणी तयार करते. एक केरसुणी बाजारात पंचवीस ते तीस रुपयांना द्यावे लागते; पण ग्राहक मात्र वीस रुपयांना मागतात. मात्र केरसुणी तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचे दर वाढल्याने त्यांच्या पदरात काहीच पडत नाही. दिवाळी सणासाठी केरसुणीला मोठ्या प्रमाणात मागणी असते. यामुळे प्रत्येक कुटुंबातील सदस्य केरसुणी बनविण्याच्या आणि बाजारात विकण्यासाठी दिवस-रात्र मेहनत करीत आहे. मात्र बाजारात केरसुणीला भाव मिळत नसल्याने हे व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. 

लॉकडाउनपूर्वी होणाऱ्या सणात बाजारात एकंदरीत विक्री ही प्रत्येक विक्रेत्याचे अडीच ते तीन हजार रुपये इतके होत असे; पण या वेळी दिवाळीत मात्र दीड ते दोन हजार एवढेच झाल्याचे विक्रेते सांगतात. ठोकरीत्या झाडू तयार करून बाजारात किंवा गावोगावी फिरून विक्री करणाऱ्या महिलांना ग्राहक हे सतत भावात घासाघीस करीत असतात. त्यामुळे त्यांना प्रत्येक नगास पाच ते आठ रुपये इतके मिळणेही अवघड होत चालल्याने दिवसभर आपल्या लेकरांसह आठवडा बाजारा उन्हात बसून विक्री करूनही उर्वरित सहा दिवस त्यांचा कुटुंब खर्च भागविणे त्रासदायक होत चालले आहे, असे इथले विक्रेते सांगतात. दिवाळी लक्ष्मीपूजन व पाडवा संपला असूनही अनेकांचा निम्म्यापेक्षा जास्त माल हा विक्रीविना तसाच पडून असल्याने त्यांच्या चिंतेत भर पडत असल्याचे चित्र दिसत होते. 

अक्कलकोट येथील केरसुणी विक्रेत्या मनीषा रोहिटे म्हणाल्या, काय करावं बघा, या वेळी आणलेला माल तसाच पडून हाय. तरी लोक वीस रुपयाला दे म्हणत्याती; पण आम्हालाच ते वीस रुपयाला पदरात आहे.केरसुनी विक्री कसं करावं हे कळेना झालाय आम्हाला. एकामागे पाच रुपयेबी मिळत नाहिती मग कसा पगार पडणार? तसेच आमचं दवाखाना व संसार खर्च कसा चालणार? तरी पहिल्यापासून हा व्यवसाय करतो म्हणून विक्री करीत आहोत. 

केरसुणी विक्रेत्या रेखा रोहिटे म्हणाल्या, या वेळी तयार मालाला मागणीच नाही. केरसुणी तयार करायचा खर्च जास्त तर विक्री भाव कमी आहे. गिऱ्हाईक चांगले केरसुणी फक्त वीस रुपयेला मागतात. तीस रुपयांना विक्री झाल्याशिवाय परवडत नाही. तरीही या वेळी लक्ष्मीपूजनास म्हणावी तशी विक्री झालीच नाही. एक दिवस सोमवारी विकून आठवडाभर पुन्हा केरसुणी जमविणे तसेच घर चालविणे आम्हाला करावे लागते. लेकरंबाळं उन्हातान्हात घेऊन दिवसभर धुळीत बसूनही आमचे पोट भरणे अवघड होत आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com