कोरोना वॉर्डात "कजरा रे कजरा रे'वर डान्स अन्‌ रंगला पत्त्यांचा डाव ! "हा' व्हिडीओ सगळीकडे व्हायरल 

श्रीनिवास दुध्याल 
Saturday, 12 September 2020

राज्यात आजपर्यंत 10 लाख 15 हजार 681 एवढे कोरोना पॉझिटिव्ह आढळले. तरी जेथे लॉकडाउन नाही, तेथील नागरिक कोरोनाची भीती न बाळगता वावरत आहेत. दरम्यान, सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील कोरोना वॉर्डातील दृश्‍य हेच दर्शवते, की कोरोनाला न घाबरता एन्जॉय करा. कोरोनावरून मन विचलित करण्यासाठी नृत्य करा, आवडते छंद जोपासा. 

सोलापूर : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, त्याचीच सर्वत्र चर्चा होत आहे. हा व्हिडीओ कोणत्या कोव्हिड केअर सेंटरमधील आहे, हे गुलदस्तातच आहे; पण त्या व्हिडीओत कोरोना पॉझिटिव्ह तथा रुग्णांच्या संपर्कातील महिला व तरुणी अमिताभ बच्चन फॅमिलीच्या "कजरा रे कजरा रे... तेरे कारे कारे नैना... मेरा चैन वैन सब उजडा...जालिम नजर हटा ले...' या गाण्यावर दिलखुलास नृत्य करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे पुरुष त्यांच्या वॉर्डात बिनधास्त पत्ते खेळत असल्याचे दिसत आहेत. कोरोनाची भीती बाळगू नका, आपले मन इतरत्र रमवा, आत्मविश्‍वास बाळगा अन्‌ सकारात्मक विचार करा... असाच संदेश त्यातून देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. 

जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. तत्पूर्वी, कोणी खोकललं तरी त्यांच्यापासून लोक लांब पळत होते. कोरोना रुग्णाला तथा त्याच्या कुटुंबाला सर्वांनी वाळीत टाकल्याचेही चित्र पाहायला मिळाले. काहींनी तर रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त ऐकून आत्महत्याही केल्या. मात्र, आता लस आलेली नसतानाही चित्र बदलले आहे. राज्यात आजपर्यंत 10 लाख 15 हजार 681 एवढे कोरोना पॉझिटिव्ह आढळले. तरी जेथे लॉकडाउन नाही, तेथील नागरिक कोरोनाची भीती न बाळगता वावरत आहेत. दरम्यान, सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील कोरोना वॉर्डातील दृश्‍य हेच दर्शवते, की कोरोनाला न घाबरता एन्जॉय करा. कोरोनावरून मन विचलित करण्यासाठी नृत्य करा, आवडते छंद जोपासा. 

"इथे' सापडल्या पोतंभर दारूच्या बाटल्या अन्‌ हाडे 
अक्कलकोट अन्नछत्र मंडळाने त्यांच्याकडील तीन मजली वास्तू 27 मार्चपासून क्वारंटाईन सेंटरसाठी दिली होती. 15 दिवसांतच त्या ठिकाणी कोव्हिड सेंटर सुरू झाले. मात्र, या ठिकाणी दाखल कोरोना रुग्णांनी दारू व मटणावर ताव मारल्याची सध्या जोरदार चर्चा रंगू लागली आहे. 

अन्नछत्र मंडळाची वास्तू दाट लोकवस्तीत आहे. क्वारंटाईन सेंटरसाठी ताब्यात घेतलेली वास्तू, नंतर कोव्हिड सेंटरसाठी वापरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. तर त्या ठिकाणी दारूच्या रिकाम्या बाटल्या आणि मांसाची हाडे सापडल्याने त्या वास्तूचे पावित्र्य भंग पावत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी व राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचल्या होत्या. 27 ऑगस्टला हे सेंटर प्रशासनाने बंद करून ती जागा अन्नछत्र मंडळाच्या ताब्यात दिली. गेल्या पाच महिन्यांपासून कोव्हिड सेंटर राहिलेल्या अन्नछत्र मंडळाची वास्तू स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले. तेव्हा आठ पोती दारूच्या बाटल्या, 10 ते 12 पोती पाण्याच्या बाटल्या, सडलेले मटण व हाडे आढळून आली. अजूनही या अन्नछत्र मंडळाची स्वच्छता सुरू असल्याची माहिती अन्नछत्र मंडळाचे सचिव श्‍यामराव मोरे यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Video of women dancing and men playing cards in Corona Ward goes viral