esakal | "राष्ट्रवादी'च्या पंढरपूर तालुकाध्यक्षपदी विजयसिंह देशमुखांची नियुक्ती ! मात्र नाराजीनाट्याची मालिका अखंडितच

बोलून बातमी शोधा

pdr_ncp}

पंढरपूर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये खांदेपालट करण्यात आले आहे. दीपक पवार यांच्या जागी कासेगाव येथील विजयसिंह देशमुख यांची तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. जिल्हा अध्यक्ष बळिराम साठे यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले. 

"राष्ट्रवादी'च्या पंढरपूर तालुकाध्यक्षपदी विजयसिंह देशमुखांची नियुक्ती ! मात्र नाराजीनाट्याची मालिका अखंडितच
sakal_logo
By
भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये खांदेपालट करण्यात आले आहे. दीपक पवार यांच्या जागी कासेगाव येथील विजयसिंह देशमुख यांची तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. जिल्हा अध्यक्ष बळिराम साठे यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले. 

विजयसिंह देशमुख हे विठ्ठल साखर कारखान्याचे संचालक असून, ते भगीरथ भालके गटाचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. श्री. देशमुख यांच्या निवडीनंतर राष्ट्रवादीमध्ये नाराजीनाट्य रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. 

अलीकडेच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये खांदेपालट करण्यात आली होती. यामध्ये विजयसिंह देशमुख यांच्याकडील पंढरपूर विधानसभा राष्ट्रवादी मतदार संघाचे अध्यक्षपद काढून घेण्यात आले होते. त्यांच्या जागी संदीप मांडवे यांची निवड करण्यात आली आहे. त्यानंतर विजयसिंह देशमुख हे नाराज होते. त्यांनी बंड करण्याचा इशारा देखील दिला होता. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील खदखद समोर आली आहे. त्यानंतर तातडीने जिल्हा अध्यक्ष बळिराम साठे पॅचअप करण्यासाठी पुन्हा विजयसिंह देशमुख यांना तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. त्यानंतर दीपक पवार हे कमालीचे नाराज झाले आहेत. दोन दिवसांत आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे श्री. पवार यांनी सांगितले. 

पदाधिकारी निवडीवरून सध्या तरी तालुक्‍यात राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये नाराजीनाट्य रंगू लागले आहे. विजयसिंह देशमुख यांची निवड होताच काल (रविवारी) दुपारी भगीरथ भालके यांच्या पंढरपूर येथील कार्यालयात त्यांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला. या वेळी राष्ट्रवादीचे सुभाष बागल, मारुती जाधव, भास्कर मोरे, गोरख ताड आदी उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल