बार्डी गावास झोडपले वादळी वारे आणि पावसाने ! द्राक्ष, डाळिंबाचे नुकसान; अनेकांचे संसार उघड्यावर

Bardi
Bardi

करकंब (सोलापूर) : बार्डी (ता. पंढरपूर) गावास सोमवारी (ता. 12) सायंकाळी सातच्या सुमारास वादळी वारे आणि पावसाने अक्षरशः झोडपून काढले. यात द्राक्ष बागा, शेडवरील बेदाणा आणि डाळिंब बागांचे तर अतोनात नुकसान झालेच पण घरावरील पत्रे उडून गेल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. 

सोमवारी दिवसभर काहीसे ढगाळ वातावरण असले तरी हवेत उकाडा जाणवत होता. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वारे आणि पावसाला सुरवात झाली. मात्र अर्ध्या तासानंतर वाऱ्याचा वेग कमालीचा वाढला. अवकाळी पाऊस घेऊन आलेले हे वारे इतके जोरदार होते की अनेकांच्या घरांवरील पत्रे उडून गेले आहेत. या वेळी लोक अक्षरशः जीव मुठीत धरून बसले होते. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. विजेचे खांबही पडल्यामुळे वीज गायब झाली होती. काही बेदाणा शेडवरील कागद उडून गेल्याने बेदाण्याचा अक्षरशः चिखल झाला. याशिवाय बहरात आलेल्या डाळिंब बागेतील फळांनी लगडलेली झाडेही जमीनदोस्त झाली. 

गतवर्षी कोरोनामुळे लाखो रुपये खर्चून जोपासलेल्या द्राक्षांना उठाव मिळू शकला नव्हता. त्यामुळे मातीमोल दराने माल विकावा लागला. त्याची भरपाई यावर्षी होईल असे वाटत असतानाच अगदी हातातोंडाशी आलेला घास लहरी निसर्गाने हिरावून घेतला आहे. काही ठिकाणी काढणीस आलेल्या गव्हाचे नुकसान झाले आहे तर वीटभट्टी चालकांनाही या पावसाचा फटका बसला आहे. "पावसाने झोडपले आणि राजाने मारले तर दाद कोणाकडे मागायची' याचा प्रत्यक्ष अनुभव येथील बळिराजा घेत आहे. 

अगदी अर्ध्या तासात शेती पिकांचे होत्याचे नव्हते झाल्याने झालेले नुकसान हताश होऊन बघण्यापलीकडे शेतकऱ्याच्या हातात काहीही उरले नव्हते. त्यातच अमावास्येचा मुहूर्त साधत आलेल्या या अस्मानी संकटाने रात्रीचा अंधार गडद होत जातानाच वीजही गायब केल्याने शेतकऱ्यांपुढील अंधार अधिकच गडद केला होता. या अवकाळी पावसाने ऐन उन्हाळ्यातही सर्वत्र सखल भागात पाणीच पाणी केले होते. रात्र होता होता हा पाऊस पडला असल्याने नेमक्‍या नुकसानीचा अंदाज येत नव्हता. 

याबाबत गाव कामगार तलाठ्यांना मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नाही. विशेष म्हणजे या पाऊस आणि वाऱ्याचा प्रभाव बार्डी आणि जाधववाडीच्या काही भागापुरताच मर्यादित होता. या अस्मानी संकटात नुकसान झालेल्या शेती पिकांचे, घरांचे आणि बेदाणा शेडचे पंचनामे होऊन नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी बार्डीचे पोलिस पाटील नानासाहेब शिंदे यांनी केली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com