esakal | शासन तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही : मुख्यमंत्री ठाकरे; पूरग्रस्तांना दिलासा दिल्याने गावकरी आशावादी 
sakal

बोलून बातमी शोधा

Akkalkot Doura

अक्कलकोट तालुक्‍यात आलेल्या पुराचे संकट हे खूपच मोठे आहे.याच्या झालेल्या नुकसानीत शासन तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. याचा मुकाबला धैर्याने करा. आपल्या नुकसानीचा पूर्ण आढावा घेऊन मार्ग काढून दिलासा दिला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.

शासन तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही : मुख्यमंत्री ठाकरे; पूरग्रस्तांना दिलासा दिल्याने गावकरी आशावादी 

sakal_logo
By
राजशेखर चौधरी

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट तालुक्‍यात आलेल्या पुराचे संकट हे खूपच मोठे आहे.याच्या झालेल्या नुकसानीत शासन तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. याचा मुकाबला धैर्याने करा. आपल्या नुकसानीचा पूर्ण आढावा घेऊन मार्ग काढून दिलासा दिला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. 

अक्कलकोट तालुक्‍यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करून जनतेला दिलासा देऊन त्यांचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला. आज सकाळी साडेदहा वाजता त्यांचे सांगवी खुर्द येथील पाहणी दौऱ्याने ठाकरे यांचा संवाद सुरू झाला. या वेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादा भुसे, 
खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, संजय देशमुख, महेश हिंडोळे, सुनील बंडगर, जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे, सरपंच बबन पवार, सुनीता जगताप, संगीता जगताप, मंजुळा जगताप, काशीबाई शेरीकर, कविता लवटे, सोनाबाई लवटे आदींनी निवेदन दिले. 

पालकमंत्र्यांच्या माध्यमातून त्यांनी आपली कैफियत मांडली. त्यात गसहा दिवस झाली आमची घरे व गावं पाण्यात आहेत. आम्हाला अजून घरी जेवण बनविता येत नाही. शेतकरी बंधू जेवण आणून देत आहेत. आमच्या गावाचे पुनर्वसन करा आणि आम्हाला घरे बांधून द्या. आमचे जीव धोक्‍यात आहे, अशी विनंती केली. 

यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, घाबरू नका, धीर धरा. तुम्हाला मदत केली जाईल, असे आश्वासन दिले. याच वेळी घरे वाहून गेलेल्या अकरा कुटुंबांना प्रत्येकी 95 हजार 500 रुपयांचा धनादेश अदा करण्यात आला. त्यानंतर सांगवी बंधाऱ्यावर जाऊन पाहणी केली. त्यानंतर हत्ती तलाव जवळील झालेल्या पूरस्थितीची पाहणी करून श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळास भेट दिली. त्यानंतर त्यांनी रामपूर येथे पूरस्थितीची पाहणी केली आणि तिथेही घरे पडझड झाल्याचा धनादेश अदा करण्यात आला. शेवटी बोरीउमरगे येथे गावाजवळ बोरी पात्रात वाट बघत बसलेल्या पंडित पाटील, अमृत बिराजदार, देवानंद अस्वले, चंद्रकांत बेळमगी, चंद्रकांत बिराजदार, लक्ष्मण बन्ने, पार्वती बिराजदार, सिद्धवा बन्ने, अनिल बिराजदार, भाग्यश्री बिराजदार, महानंदा बिराजदार, चनमलप्पा बिराजदार, जयश्री वागदरी, दत्ता वागदरी, सिद्धबाई बेळमगी आदींसह ग्रामस्थांनी "गावातील शाळा पाण्यात आहेत, घरे पाण्यात गेली, शेती पाण्यात आहे, स्वयंपाक करायला जागा नाही, आमच्या गावाचे 
पुनर्वसन करा, आम्हाला घरे बांधून द्या, तातडीची आर्थिक मदत करा तसेच ऊस, कांदा व तूर हे पाण्यात आहेत त्यांची मदत तत्काळ देऊन दिलासा द्या' अशी मागणी केली. 

या वेळी ठाकरे म्हणाले, पुराचे संकट तर मोठे आहेच. त्याचबरोबर कोरोनाचे संकट देखील खूप मोठे आहे. त्याकडेही दुर्लक्ष करू नका. तसेच कुणीही घाबरू नका. तुमच्या प्रत्येक अडचणीची नोंद घेऊन तुम्हाला मदत करू आणि तुमच्या संकटात आम्ही तुम्हाला दिलासा देऊन शासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील', असा शब्द दिला. 

या वेळी बोरीउमरगे ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांना आपले आमदार सचिन कल्याणशेट्टी हे सलग तीन दिवसरात्र आमच्या बरोबर राहिले असून रात्री पाण्यात उतरून नागरिक व जनावरांचे जीव वाचविले आहे. तो देवमाणूस म्हणून लाभल्याचे कळविले. आणि ठाकरे यांनी सुद्धा त्याबाबत कौतुकाची भावना व्यक्त केली. एकंदरीत मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अक्कलकोट तालुक्‍यातील दौऱ्याने नागरिक मात्र आशावादी दिसले आणि या संकटात ते पाहणी करण्यासाठी येऊन आम्हाला दिलासा देण्याचे प्रयत्न केल्याची भावना व्यक्त केली. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल