होडीचालकाने वाचवला महापुरातून नऊजणांचा जीव ! ग्रामस्थांनी केली राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानाची मागणी 

सुनील कोरके 
Friday, 23 October 2020

वेळ भयाण अंधारलेल्या रात्री दोनची... चोहोबाजूला प्रचंड वेगाने वाहणारे पुराचे पाणी... एका घरात 85 वर्षांची लक्ष्मी, बोलता व ऐकता न येणारा मुलगा दुर्योधन व 65 वर्षांची बहीण नागिना अडकलेले... घरात काळाकुट्ट अंधार... घराला आतून कडी अन्‌ घराच्या उंबऱ्याला लागलेले पुराचे पाणी... त्यांच्यासह नऊजणांचा जीव एका होडीचालकाने वाचवला. 

भोसे (सोलापूर) : वेळ भयाण अंधारलेल्या रात्री दोनची... चोहोबाजूला प्रचंड वेगाने वाहणारे पुराचे पाणी... एका घरात 85 वर्षांची लक्ष्मी, बोलता व ऐकता न येणारा मुलगा दुर्योधन व 65 वर्षांची बहीण नागिना अडकलेले... घरात काळाकुट्ट अंधार... घराला आतून कडी अन्‌ घराच्या उंबऱ्याला लागलेले पुराचे पाणी... त्यांच्यासह नऊजणांचा जीव एका होडीचालकाने वाचवला. 

ही कोणत्या नाटक किंवा सिनेमाची कथा नाही तर देवडे (ता. पंढरपूर) येथील पुराच्या पाण्यात अडकलेल्या निराधार कुटुंबाची वास्तव कथा आहे. सलग झालेल्या मुसळधार पावसाने उजनी धरण भरले होते. त्यामुळे भीमा नदी पात्रात पाणी सोडण्यात आले होते. भीमा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला होता. या परिस्थितीत नागरिकांची सुरक्षित स्थळी व्यवस्था केली होती; परंतु शुक्रवारी (ता. 16) पहाटे दोन वाजता एक कुटुंब पुरातच अडकून राहिल्याचे तलाठी प्रकाश भिंगारे यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने होडीचालक रमेश भुई यांच्यासह मोजक्‍या व धाडसी सहकाऱ्यांना घेऊन त्या कुटुंबाला बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. 

अंधाऱ्या रात्री विजेचे खांब, वाहत आलेली मोठमोठी झाडे चुकवत अरुंद जागेतून त्यांच्या घरी पोचले. 85 वर्षे वयाची व 90 किलो वजनाची अर्धांगवायू झालेली लक्ष्मी बापू नाईकनवरे, मूकबधिर दुर्योधन बापू नाईकनवरे व बहीण नागिना मनोहर गायकवाड यांना होडीत घातले.

होडी पुराच्या पाण्यातून हाकत असताना अचानक होडीची तळाशी असणारी चिमणी तुटली. होडी एका बाजूला ओढू लागली. पुराच्या पाण्याचा प्रचंड वेग. होडीमध्ये एकूण नऊजण. सर्वांच्या अंगाचा थरकाप उडाला. आता आपली यातून सुटका नाही, अशी सर्वांच्या मनाची अवस्था झालेली. अशाही परिस्थितीत होडीचालक रमेश सलामपुरे (भुई) याने कशाचाही विचार न करता होडीच्या समोर पाण्यात उडी घेतली आणि होडीच्या घोड्याखालील कडी पकडून पाण्याखाली बुडून सुमारे 300 फूट होडी हाकली आणि नऊ जणांचे प्राण वाचवले. 

होडीचालक सलामपुरे यांच्या धडासाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत असून, राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांचा सन्मान व्हावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांमधून होत आहे. या वेळी त्यांच्याबरोबर रामचंद्र झांबरे, गणेश पाटील, धनाजी करडे, मसू नाईकनवरे व कुमार कांबळे होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Villagers demand President to honor boatman who saved nine lives from floods