
मूळचे मालवंडी येथील रहिवासी असलेले श्री. सरवदे हे कोरोनाच्या संकटात लॉकडाउनमध्ये आपल्या गावी येऊन "वर्क फ्रॉम होम' करत होते. याच कालावधीमध्ये गावातील अनेक लोक जे उपजीविकेसाठी परगावी गेले होते, तेही गावी परतले होते. गावात नवे-जुने मतप्रवाह एकत्र आले. जुन्या-नव्या ग्रामस्थांची मने व मते जुळू लागली. सर्वांमधून "गावासाठी आपण काहीतरी करूया !' हा विचार व निर्धार पक्का झाला.
सासुरे (सोलापूर) : मालवंडी म्हणजे बार्शी तालुक्यातील हिंदू-मुस्लिम ऐक्य जपणारं गाव... विविधतेने नटलेलं... अठरा पगडजाती येथे सुखानं नांदतात आणि इथंच एक नव्हे दोन नव्हे तर सलग पन्नास वर्षे अखंडितपणे गावकऱ्यांनी आपली ग्रामपंचायत बिनविरोध केली... त्याच गावकऱ्यांमध्ये अलीकडच्या 10-15 वर्षांत गटतट झाले... अंतर्गत मतभेद वाढले, सत्तासंघर्ष झाला आणि बिनविरोधची परंपरा मोडित निघाली. मात्र, या पंचवार्षिक निवडणुकीत पुन्हा ग्रामस्थांनी आपले राजकीय पक्षांचे व जाती-धर्माचे जोडे बाजूला ठेवून यंदाच्या ग्रामपंचायतीची निवडणूक यशस्वीपणे बिनविरोध केली. आता या बिनविरोधच्या परंपरेने अर्धशतक पूर्ण केले आहे.
गावात एखादा उच्चशिक्षित आणि सर्वांना एकत्र आणणारा अधिकारी असेल तर त्याचा गावासाठी काय उपयोग होऊ शकतो, हे मालवंडी (ता. बार्शी) येथील राजेंद्र सरवदे (जीएसटी उपायुक्त, मुंबई) यांनी दाखवून दिले आहे. मूळचे मालवंडी येथील रहिवासी असलेले श्री. सरवदे हे कोरोनाच्या संकटात लॉकडाउनमध्ये आपल्या गावी येऊन "वर्क फ्रॉम होम' करत होते. याच कालावधीमध्ये गावातील अनेक लोक जे उपजीविकेसाठी परगावी गेले होते, तेही गावी परतले होते. गावात नवे-जुने मतप्रवाह एकत्र आले. जुन्या-नव्या ग्रामस्थांची मने व मते जुळू लागली. सर्वांमधून "गावासाठी आपण काहीतरी करूया !' हा विचार व निर्धार पक्का झाला. मग बाहेरून आलेल्या व गावातील तरुणांना राजेंद्र सरवदे यांनी अधिक जवळ व घट्ट केले. त्यांची मते समजून घेतली. त्यांच्याशी नियमित विचारविनिमय ठेवला. बैठका, मेळावे झाले आणि बैठकीत सर्वांसमोर गावची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव मांडला. बिनविरोध करण्याचे मनसुबे व फायदेही सांगितले. मग सुरू झाले खलबते.
या प्रक्रियेला हळूहळू मालवंडी ग्रामस्थांनी तसेच सर्वच राजकीय पक्षांतील नेतेमंडळींनी आणि विविध जाती- धर्मातील समाज प्रमुखांनी चांगलेच मनावर घेतले. सर्वांनी मान्यता दिली. सर्वांच्या कष्टाला यश येत गेले. गावात पुन्हा एकतेचे शांत वारे वाहू लागले. यामध्ये तरुणांनी मोठा संयम दाखविला. ज्येष्ठांनी व जाणकारांनी यशस्वी एकमताचे बिजे पेरली. यशाचे मार्ग दाखवले आणि अखेर सर्वानुमते नवे तडफदार व कर्तबगार सदस्य निवडून बिनविरोध करण्याचे ठरले आणि ते यशस्वी केले. आणि पन्नास वर्षांनंतर खंडित पडलेली बिनविरोधची परंपरा अखंडित झाली.
गावाने ग्रामपंचायतीवर पुन्हा कर्तृत्वक्षम व गावासाठी योगदान देणाऱ्या सदस्यांना बिनविरोध संधी दिली. एकोप्याने गावात निवडणुकीशिवाय एका विचाराने नवीन सदस्य निवडून देता आले. त्यामुळे सर्वांना आपल्या गावात आनंदाचे वातावरण ठेवता आले.
दृष्टिक्षेपात...
यांनी घेतला पुढाकार...
राजेंद्र सरवदे (विक्री कर उपायुक्त), निवृत्त डीवायएसपी रामभाऊ थोरात, श्रीमंत थोरात, बाबा काटे, धन्यकुमार साखरे, संतनाथ खंडागळे, पिंटू पाडुळे, ममशाद मुजावर, वामन काटे, दादा खंडागळे, विष्णू साखरे, सोमनाथ थोरात, पांडुरंग सलगर, सुनील सलगर, अनिल पाटील, अशोक काटे, विश्वनाथ दहिडकर व ज्येष्ठ ग्रामस्थ.
नवनिर्वाचित सदस्य...
संपादन : श्रीनिवास दुध्याल