
सोशल मीडियाद्वारे निवडणूक अचारसंहितेचा भंग झाल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, अशी नोटीस मोहोळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांनी प्रत्येक गावाच्या पोलिस पाटलांना बजावली आहे.
वाळूज (सोलापूर) : सोशल मीडियाद्वारे निवडणूक अचारसंहितेचा भंग झाल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, अशी नोटीस मोहोळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांनी प्रत्येक गावाच्या पोलिस पाटलांना बजावली आहे.
यात म्हटले आहे, की, गावातील सर्व ग्रामस्थांना, युवकांना व सुज्ञ नागरिकांना नम्र विनंती आहे, की सध्या गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकांचा कालावधी आहे. सर्वांनी फेसबुक, व्हॉट्सऍप यांसारख्या सोशल मीडियाचा वापर करताना आचारसंहितेचा भंग होईल अशा प्रकारचे कृत्य कोणीही करू नये. तसेच कोणाच्याही वैयक्तिक भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्यावी. कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून निवडणुका शांततेत पार पाडाव्यात.
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे. 15 जानेवारी रोजी मतदान व 18 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीची आदर्श आचारसंहिता जिल्ह्यात आणि मोहोळ तालुक्यात लागू करण्यात आलेली आहे. यामध्ये वाळूज, देगाव, भैरववाडी - मनगोळी ग्रुप ग्रामपंचायतींसह 63 ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. आपणास या नोटिशीद्वारे समज देण्यात येते की, ग्रामपंचायत निवडणूक व प्रचारावेळी आदर्श आचारसंहिता विषयक निर्देशानुसार आपल्या गावात आपल्या कार्यक्षेत्रामध्ये विना परवानगी कुठल्याही प्रकारची राजकीय बैठक, प्रचार, कॉर्नर बैठका, पदयात्रा होणार नाही. प्रचारा वेळी आपल्याकडून कोणत्याही प्रकारचे प्रक्षोभक भाषण अथवा दोन किंवा अधिक जातीय व गटात तेढ निर्माण करणारे भाष्य करू नये. सोशल मीडिया / मोबाईलमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
अपर जिल्हादंडाधिकारी सोलापूर यांच्याकडील म. पो. 1951 चे कलम 30(1) प्रमाणे आदेश लागू आहे. तरी आपल्याकडून ग्रामपंचायत निवडणूक काळात अनुचित प्रकार घडल्यास तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी आपणास व उमेदवारास जबाबदार धरून आपल्या विरुद्ध प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच प्रचारावेळी अथवा मतदानादिवशी कोव्हिड 19 च्या अनुषंगाने कोरोना संसर्ग या साथीच्या रोगाच्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने खबरदारीची उपाययोजना करणे आवश्यक आहे. ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी याकरिता सी.आर.पी.सी. 149 प्रमाणे नोटीस देण्यात येत आहे. वरील नोटिशीचे उल्लंघन केल्यास प्रचलित कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल.
संपादन : श्रीनिवास दुध्याल