कोरोना : बार्शीकरांकडून जिभेचे चोचले पुरविण्यासाठी नियमभंग 

प्रशांत काळे 
शनिवार, 28 मार्च 2020

बार्शी नगरपरिषदेने मध्यवर्ती महात्मा फुले भाजी मंडईमध्ये नागरिकांची भाजी खरेदीसाठी होत असलेली गर्दी पाहून मंडई बंद केली. दहा वेगवेगळ्या चौकात भाजी विक्रेत्यांना विभागून बसवविण्यात आले आहे

बार्शी : संपूर्ण देश, राज्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून शासनाचे लॉकडाऊन आदेश असतानाही अतिउत्साही बार्शीकर जिभेच्या चोचल्यांसाठी भल्या पहाटेपासून भाजी, दूध, मटन, मासे, फळे खरेदी करण्यासाठी गर्दी करताना दिसून येत असून पोलिस प्रशासनाने हात टेकले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपत्कालीन काळामध्ये अत्यावश्‍यक सेवा सुरु राहतील, सुविधा मिळतील याचा गैरफायदा नागरिक घेत असल्याचे चित्र मागील दोन दिवसांपासून शहरात दिसत आहे. 

बार्शी नगरपरिषदेने मध्यवर्ती महात्मा फुले भाजी मंडईमध्ये नागरिकांची भाजी खरेदीसाठी होत असलेली गर्दी पाहून मंडई बंद केली. दहा वेगवेगळ्या चौकात भाजी विक्रेत्यांना विभागून बसवविण्यात आले आहे. पण तेथे नागरिकांमध्ये जागरुकता दिसून येत नाही. आठवड्यातून दोनदा भाजीसाठी बाहेर पडावे. त्यामुळे गर्दी होणार नाही, संसर्ग होणार नाही, ही काळजी करताना नागरिक दिसत नाहीत. रोज ताजी भाजी प्रत्येकाला हवी आहे. फळे, मटन विक्रेत्यांकडेही यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. घाऊक किराणा दुकानात ग्रामीण भागातील किराणा दुकानदारांची झुंबड पडत आहे. कसलीही शिस्त नाही. कोरोनाच्या संसर्गाचा धोका या विक्रेत्यांना जाणवतदेखील नाही. प्रत्येक कुटुंबाकडे साधारण महिना अथवा पंधरा दिवसांचा किराणा भरलेला असतो, पण पुढील एक महिन्याचा साठा करण्यासाठीही काहीं कुटुंबेही धावपळ करताना दिसत आहेत. 
शहरात सकाळी सात ते दहाच्या दरम्यान सर्वत्र गर्दी दिसते. मटन खरेदी, किराणा, फळविक्रेते, दूध खरेदी यांच्याकडे गर्दी करून नागरिक खरेदी करताना दिसत आहेत. दुपारी दोन नंतर रस्ते ओस पडून शुकशुकाट होत आहे. हे दृश्‍य पाहून पोलिसांनी हात टेकले आहेत. शहरात अनेक व्यापारी या परिस्थितीचा गैरफायदा घेताना दिसत असून पेट्रोल, गोडेतेल, तंबाखूजन्य पदार्थ, प्रत्येक वस्तूंचे दर चढ्या भावाने विक्री करीत असून पॅकींगची मुदत संपलेल्या वस्तुंची विक्री होत असताना दिसत आहे. महसूल प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे. बार्शीकरांनो स्वतःच्या कुटुंबासह स्वतःसाठी, देशासाठी घरी जे आहे ते आनंदाने खाऊन उदरनिर्वाह करावा. आगामी पंधरा दिवस परीक्षा घेणारे असून गेलेली वेळ सांगून येणार नाही, परत पस्तावल्यासारखे होईल, असे वैद्यकीय अधिकारी सांगत आहेत. 

संसर्गाचा धोका लक्षात घेऊन विविध पथके
शहरातील पूर्ण परिस्थितीची माहिती घेण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी, पोलिस निरीक्षक यांच्याबरोबर बैठक घेतली. त्याशिवाय पांगरी, वैराग येथेही बैठक घेतली असून संसर्गाचा धोका लक्षात घेऊन विविध पथके, समित्या स्थापन करुन नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यात येत आहे. 
- प्रदिप शेलार, तहसीलदार, बार्शी
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Violation of the tongue by Barshikar